सामना अग्रलेख – सिंहगर्जनेची शताब्दी!

भारतीय घटनेनुसार प्रत्येक भाषिकासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झाले. भाषिक प्रांतरचना त्यानुसार झाली. मग फक्त मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यासाठी साडेचार वर्षे दिल्लीशी युद्ध का करावे लागले? मुंबईसह महाराष्ट्र आम्ही लढून मिळवला. मराठी माणसाने रक्त सांडले, बलिदाने दिली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र अखंडच राहायला हवा. ‘‘महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही,’’ अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सिंहगर्जनाच होती. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना होती. ही सिंहगर्जना आजही घुमत आहे. या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे. याच सिंहगर्जनेने मुंबईवर मराठी ठसा कायम राहिला. सिंहगर्जनेला शंभर वर्षे झाली तरी ती जमिनीवर, आसमंतात घुमतच आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. आज ते हयात असते तर वयाच्या शतकात प्रवेश केला असता. हा शतक सोहळा राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांनी, शिवसैनिकांनी धामधुमीत साजरा केला असता, पण आजही राज्यभरात हा सोहळा होतच आहे. षण्मुखानंद सभागृहातील मुख्य सोहळ्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन शिवसेनाप्रमुखांना एकत्र मानवंदना देतील यापेक्षा बाळासाहेबांच्या वाढदिवसाची सुंदर भेट कोणती असू शकेल? थोर पुरुषांचे वय मोजायचे नसते. बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तींचे मोठेपण त्यांच्या वयावर अवलंबून नसते. वय वाढून अजूनही येथे रेंगाळत बसलेले, देशाला भार झालेले अनेक जण श्वास घेत पडले आहेत, पण बाळासाहेबांसारखे नेते सदैव अमर, हवेहवेसे वाटतात. त्यांचे मोठेपण वयावर अवलंबून नसते. कार्यावर, विचारांवर आणि त्यांनी आपल्या समाजासाठी केलेल्या योगदानावर अवलंबून असते. मनुष्याचे अंतरंग स्पष्टपणे व्यक्त होण्याची वेळ व त्याच्या खऱ्या कसोटीचा प्रसंग म्हणजे संकट. त्या वेळी तेजस्वी पुरुष हताश होऊन स्वस्थ बसत नाही. बाळासाहेबांच्या बाबतीत तेच घडले. ज्या ‘मराठी’ समाजाचे आपण घटक आहोत तो विस्कळीत झाला आहे, नेतृत्वहीन आणि बिनपाठकण्याचा झाला आहे. त्याच्या मताला आणि अस्तित्वाला किंमत राहिलेली नाही. त्याला सार्वजनिक मत नाही, राजदरबारात किंमत नाही. या महाराष्ट्र भूमीत जन्म घेऊनही ‘मराठी’ म्हणून सतत अवहेलनाच होत आहे. हा अन्याय आहे असे बाळासाहेबांच्या मनाने घेतले. परिणामी मराठी लोकांत जागृती व ज्वलंत संघटन हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण आमरण झटत राहावयाचे असा निर्धार त्यांनी केला. त्याच निर्धारातून ‘शिवसेना’ या जहाल संघटनेची ठिणगी पडली. पन्नास वर्षांनंतरही या ठिणगीतून पेटलेली मशालीची धग कायम आहे. शिवसेनेचा लढा हा जातीय आणि प्रांतीय नसून तो रोजीरोटीचा, मानसन्मानाचा आणि

स्वाभिमानाचा लढा

आहे. खरे म्हणजे या मुंबई शहरात बाळासाहेबांनी शिवसेना जन्मास घातली नसती तर या महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी माणसाचे कायमचेच उच्चाटन झाले असते. एकतर मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी आणि त्यात भर बेपर्वा राज्यकर्त्यांची. त्यामुळे मुंबईची अवस्था ‘आव जाव घर तुम्हारा’ अशा धर्मशाळेसारखी झाली. गेल्या पन्नास वर्षांत या धर्मशाळेची व्याप्ती वाढली आहे. मुंबईतून अडीच लाख गिरणी कामगार गायब झाला. त्यामुळे गिरणगावचा इतिहास, भूगोल बदलला. गिरणगावातल्या ‘चिमण्या’ गेल्या व तेथे टोलेजंग टॉवर्स निर्माण झाले. या ‘टॉवर्स’मध्ये मराठी माणसाचे अस्तित्वच उरले नाही. ते सर्व टॉवर्स राक्षस बनून मुंबईचे ‘मराठीपण’ उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. अशा वेळी आजही बाळासाहेबांची आठवण येते. आज बाळासाहेब हवे होते असे सगळ्यांना वाटते. आज बाळासाहेब नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेली शिवसेना सदैव मराठी माणसाच्या रक्षणाचेच काम करीत आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेना त्यांचे कार्य पुढे नेत आहे. म्हणजे बाळासाहेबांनी किती मजबुतीने व विचारपूर्वक संघटनेचे जाळे उभे केले! बाळासाहेब मराठी अभिमानी होते. मराठीला न्याय्य हक्क मिळायलाच हवा हे त्यांचे ठाम मत होते. अर्थात म्हणून त्यांनी इतर भाषिकांचा कधी द्वेष केला नाही. कधी कुणाशी ते सुडाने वागले नाहीत. राजकीय भांडण ‘शत्रू’च्या घरापर्यंत नेले नाही. ते दीर्घद्वेषी नव्हतेच. मुंबई रोजगाराची खाण आहे. ‘‘या, कष्ट करा, कमवा, पण मुंबईवर मालकी हक्क सांगू नका’’ एवढेच त्यांचे म्हणणे असायचे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट म्हणून ते सगळय़ांनाच प्रिय ठरले. आपल्या समाजासाठी, धर्मासाठी लढणारा व विकला न जाणारा नेता अशी त्यांची ख्याती झाली. बाळासाहेब हिंदूंचे नेते झाले तेव्हा आजचा भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या नावाखाली चाचपडत होता. त्यांना हिंदुत्वाचा सूर सापडत नव्हता. तो सूर बाळासाहेबांमुळे गवसला. आज ज्या धर्मांध हिंदुत्वाचा आधार भाजपने घेतला आहे, तसले हिंदुत्व बाळासाहेबांनी कधीच मान्य केले नाही. हिंदुत्वाचा संस्कार त्यांनी सांभाळला. त्यांनी

उदारमतवादी हिंदुत्व

स्वीकारले, पण ‘‘होय, हे हिंदू राष्ट्रच आहे’’ अशी गर्जना करायला ते कचरले नाहीत. केमाल पाशाच्या चारित्र्याचा बाळासाहेबांवर मोठा प्रभाव होता. भारतातील मुसलमानांनी केमाल पाशाचा आदर्श बाळगावा असे ते जाहीरपणे सांगत. केमाल पाशाने तुर्कस्तानात खलिफा आणि खिलाफत ही दोन्ही बुडवून शेकडो वर्षांच्या धार्मिक गुलामगिरीतून तुर्कांना मुक्त केले. अरबी लिपी नि फेज टोपी यातून तुर्कांची मुक्तता केली. सर्व दृष्टींनी एक नवराष्ट्र निर्माण केले. भारताच्या नवनिर्माणात त्याच पद्धतीने मुसलमानांनी सामील व्हावे. धर्मांधता वगैरेंच्या बेड्यांतून मुक्त व्हावे. भारतभूमीला मातृभूमी मानून जे या राष्ट्रावर प्रेम करतात अशा सर्व मुसलमान बांधवांवर बाळासाहेबांनी प्रेम केले. मुसलमानांची मते म्हणजे फक्त ‘व्होट बँक’ बनता कामा नये हे त्यांचे ठाम मत होते. पाकड्यांना मानणाऱ्या धर्मांधांचे संकट भारतावर घोंघावू लागले तेव्हा बाळासाहेब कडाडले व म्हणाले, ‘‘हिंदूंनो, माथेफिरू व्हा.’’ शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी असल्याचा शिक्का मारला, तो चुकीचा होता. भारतीय घटनेनुसार प्रत्येक भाषिकासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झाले. भाषिक प्रांतरचना त्यानुसार झाली. मग फक्त मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यासाठी साडेचार वर्षे दिल्लीशी युद्ध का करावे लागले? मुंबईसह महाराष्ट्र आम्ही लढून मिळवला. मराठी माणसाने रक्त सांडले, बलिदाने दिली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र अखंडच राहायला हवा. ‘‘महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही,’’ अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सिंहगर्जनाच होती. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना होती. ही सिंहगर्जना आजही घुमत आहे. या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे. याच सिंहगर्जनेने मुंबईवर मराठी ठसा कायम राहिला. सिंहगर्जनेला शंभर वर्षे झाली तरी ती जमिनीवर, आसमंतात घुमतच आहे.