लेख – सुभाषबाबूंचे झुंझार नेतृत्व

>> विनायक श्रीधर अभ्यंकर

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक वादळे उठली व शमूनही गेली. या वादळांत अनेक योद्धय़ांच्या नेतृत्वाचा कस लागला. काही ठिकाणी हे नेतृत्व थिटे पडले तर प्रसंगी ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तावून सुलाखून निघाले. एकांडा शिलेदार म्हणून एका तेजःपुंज नरशार्दुलाला स्मृतीच्या पडद्याआड जावे लागले, पण त्या आक्रमक सरसेनापतीने परदेशात जाऊन मातृभूमीच्या मुक्ततेसाठी देह झिजवला, मृत्यूला कवटाळले. नेताजी सुभाषचंद्र बोस असे या नरशार्दुलाचे नाव.

किशोर वयात कै. ना. सी. फडके यांच्या प्रणयरम्य कथा वाचत असतानाच त्यांच्या लेखणीतून अवतरलेल्या तीन कादंबऱया वाचनात आल्या आणि स्वातंत्र्य संग्रामातील एका रुबाबदार लष्करी नेतृत्वाचे व आमचे अतूट नाते झाले ते कायमचे. ते वादळी व पराक्रमी म्हणजेच रणशीलतेचा मानदंड नेताजी सुभाषचंद्र बोस होय. 1940-41 या सालापासून छत्रपतींच्या बरोबरीने आपल्या देवघरात प्रत्येक मराठी कुटुंबात लटकणारी ती देखणी औरस-चौरस तसबीर आजही माझ्या आदराचा विषय आहे.

लाल, बाल आणि पाल या कसदार नेतृत्वाच्या राजकीय अस्तानंतर अहिंसा व बंधुत्व या धोरणाला चालना मिळून पद्धतशीरपणे ब्रिटिशांनी क्षात्रतेजाला मूठमाती दिली, परंतु पराक्रमी सळसळणाऱया रुधिराला हे सामोपचाराचे व बेगडी समन्वयाचे राजकारण सहन होत नव्हते. शत्रू तो शत्रू, त्याच्याशी नमते धोरण घेऊन आमच्या अस्मितेचा गळा घोटण्याचा जीवघेणा खेळ खुदिरामच्या मातीचा वास असलेल्या सुभाषरूपी सूर्यफुलास रुचला नाही. याच सुमारास या नरशार्दुलाची मुंबई मुक्कामी क्रांतिकारकांचे मुकुटमणी वीर सावरकरांशी भेट  नियतीने घडवून आणली. या भेटीत सावकरांनी नेताजींना या कचखाऊ वातावरणातून बाहेर पडून  परदेशातील इंडियन रिपब्लिकन आर्मी आझाद हिंद सेना तुमच्या नेतृत्वाची वाट पाहते आहे, असा सल्ला देऊन ‘तुम्ही रासबिहारी बोस यांच्या जागी सैन्याचे नेतृत्व करावे’ असे विनवले. यापासून स्फूर्ती घेत नेताजींनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेत सरळ थेट जपान गाठला व वयोवृद्ध रासबिहारी बोस यांच्याकडून आझाद हिंद फौजेची धुरा संभाळली. दुर्दैवाने पुढे नेताजींचा अपघाती मृत्यू झाला. त्याचे गूढ अद्याप कायम आहे.

परदेशात असणाऱया भारतीय क्रांतिकारकांचा व समविचारी ब्रिटिशविरोधी प्रभूतींचा आधार घेऊन नेताजींना आपला लढा लढवावा लागला. दुसऱया महायुद्धानंतर फ्रान्सची अस्मिता जागृत करण्यासाठी फ्रेंच अध्यक्ष जनरल द गॉल यांनी वेळप्रसंगी अपमान सहन करून आपल्या जीवाचे रान केले व फ्रान्सची मान उंचावली. असाच प्रयत्न नेताजींनी करताना जो जो आपल्या कार्यात मदत करू इच्छितो त्याला त्याला भेटून मदतीचा हात मागितला. मग तो अफगाण नेता असो, जपानी राज्यकर्ता असो की हिटलर असो. जनरल द गॉल युद्धोत्तर काळात फ्रान्सचे सर्वेसर्वा झाले, पण घातपाताचा संशय अद्याप असलेल्या अपघाती घटनेत महात्मा गांधींना सर्वप्रथम ‘राष्ट्रपिता’ संबोधणारा हा सुभाषचंद्र बोस हा संन्यस्थ योद्धा अनंतात विलीन झाला. हिटलरसारख्या हुकूमशहाशी युद्ध मदतीबद्धल वाटाघाटी करताना या देशभक्त योद्धय़ाने स्पष्ट केले होते की, ‘भारतीय मातीवर केवळ आमचाच म्हणजे आझाद हिंद सेनेचाच अधिकार राहील. आमचे राज्य सार्वभौम असेल आणि आमच्या राजकारणात कुणाचीही ढवळाढवळ आम्ही सहन करणार नाही हे आपण लक्षात घ्यावे.’ कारण रशियावर स्वारी करत भारताच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचे आडाखे हिटलर बांधत आहे हे नेताजींनी तो युद्धभूमीचा नकाशा दाखवत पुढील मोहिमा स्पष्ट करताना हेरले होते. त्यानंतर देशगौरव सुभाषबाबू पाणबुडीमधून त्या दुसऱया महायुद्धाच्या काळात जीवावर उदार होऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रवास करत होते. म्हणूनच आजही ‘देशगौरव नेताजी’ हे नाव घेताच मान आपोआप मुजरा करण्यासाठी झुकते. नेताजींची हिटलरबरोबरची ही भेट 28 मे 1942 या दिवशी झाली होती.

सुभाषबाबू प्रथम ‘राष्ट्रीय सभेचे म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष बनले. तेही 95 जास्त मतांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री पट्टाभिसीतारामय्यांविरुद्ध. महात्मा गांधी व सुभाषबाबू यांची पहिली भेट दिनांक 16 जुलै 1921 या दिवशी, परंतु नेताजींचा आक्रमक स्वभाव व राष्ट्रीय सभेच्या पुढाऱ्यांचा नेमस्त आस्ते कदम स्वभाव हे सूत्र जमू न शकल्याने सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला आणि आपली वेगळी वाट पकडली. खरे पाहता काँग्रेस व नेताजी यांचे अंतिम उद्दिष्ट स्वराज्य हेच होते, परंतु कार्यप्रणालीत व तत्त्वांत महदंतर पडल्याने सुभाषबाबूंना देशाबाहेर जाऊन लढा द्यावा लागला, पण ब्रिटिशांना यातून योग्य तो बोध घ्यावा लागला. त्यात भर पडली ती नौसेनेच्या बंडाची. मग मात्र चेंबरलेन यांना हाऊस ऑफ कॉमनमध्ये 1945 साली भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा करावी लागली. अशा तऱहेने ‘कधीही राणीच्या राज्यावर सूर्य मावळत नाही’ असे मानणाऱयांना धडा मिळाला.

जपान, इटली यांनी जेरबंद केलेल्या भारतीय सैन्याला एकत्र करून नेताजींनी भारताच्या सीमेवर कोहिमा, इंफाळपर्यंत धडक मारली व त्यांनी मोईराँग या इंफाळमधील शिखराचा ताबा घेतला व भारताचा तिरंगा फडकवला.