
>> साधना गोरे
हल्ली आपण घराबाहेर पडताना तयार होतो आणि काही खास कार्यक्रम असेल तर खास तयार होतो. थोडक्यात, आपण नट्टापट्टा करतो किंवा आजच्या मराठीत सांगायचं तर मेकअप करतो. या तयार होण्याला किंवा नट्टापट्टा करण्याला पूर्वी मराठीत ‘वेणीफणी करणं’ म्हटलं जायचं. व्याकरणदृष्टय़ा ‘वेणीफणी’ हा सामासिक शब्द आहे, ज्याचा अर्थ केवळ केस विंचरणं इतकाच नसून कुंकू/टिकली लावणं, काजळ रेखणं इ. कृतीही त्यात गृहीत आहेत. लग्नात रुखवतातच मुलीला फणेरं दिलं जातं. त्या फणेऱयाच्या डब्यात कंगवा, कुंकू, आरसा, काजळ इ. साहित्य असतं.
हल्ली मराठीत ‘फणी’ऐवजी ‘कंगवा’ शब्द सर्रास वापरला जातो. ‘कंगवा’ शब्दाचं मूळ ‘कंकत’ या संस्कृत शब्दात असून कक्कत, कङ्कअ असा बदलत तो मराठीत आला. मराठीशिवाय तो हिंदी (कंगुवा/कंघा/कंघी), सिंधी (कंगो) या भाषांमध्येही वापरला जातो. संस्कृतमध्ये ‘फण’ शब्दाचा अर्थ सापाचा फणा असा आहे. मराठीतही सापाचा फणा/फणी असा शब्दप्रयोग केला जातो. मात्र कंगवा या अर्थाने फणी शब्दाचा विचार करता त्याचं मूळ कानडीत असल्याचं दिसतं. कानडीमध्ये पंगव्याला फनी/हनिगे म्हटलं जातं.
साधारणपणे पट्टीच्या एका बाजूला दात असले की मराठीत त्याला कंगवा म्हटलं जातं आणि पट्टीच्या दोन्ही बाजूला दात असले की तिला फणी म्हटलं जातं. केस विंचरण्यासाठी फणीच्या दातांची ज्या प्रकारची रचना असते, तशीच काहीशी रचना केळीच्या घडातील केळींची असते. त्या घडातील एकेका केळीच्या गुच्छाला म्हणूनच फणी म्हटलं जात असावं. शेतात पेरणीसाठी वापरल्या जाणाऱया तिफण या अवजाराची रचनाही अशीच असते. महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पिकाच्या तीन ओळी पेरण्यासाठी तिफणीचा उपयोग केला जातो. चौफणी, पाचफणी, बाराफणीही असतात. केस विंचरण्याची फणी आणि या तिफणीतील साम्यही लक्षणीय आहे.
फणी शब्दाचा शोध घेताना शब्दांच्या काही गमती समोर येतात. कंगव्याला – फणीला दात असतात, तसे पुढे दात असणाऱया व्यक्तीला ‘फावडा’ हा हेटाळणीदर्शक शब्द वापरला जातो. खरं तर फावडे हे माती भरण्यासाठी वापरलं जाणारं अवजार आहे. तसंच शेतातला पाला भरण्यासाठी फावडय़ासारखंच, पण वीतभर दात असलेलं आणखी एक अवजार वापरलं जातं, त्याला दातकं म्हटलं जातं. विशेषतः शेतातला ऊस कारखान्यात गेला की, शेतभर विखुरलेला ऊसाचा वाळला पाला या दातक्याने एका ठिकाणी गोळा केला जातो. वाळू गोळा करण्यासाठीही दातक्यासारखंच आणखी एक अवजार आहे, त्याचे दात सापाच्या फणीसारखे आतल्या दिशेला मुडपलेले असतात. साधारणतः हाताचा तळवा उभा करून बोटे मुडपल्यावर होणाऱया आकारासारखा त्याचा आकार असतो. कापड विणण्यासाठी ज्यात दोरे ओवतात त्या लाकडी चौकटीला मागाची फणी म्हणतात.
एखादी व्यक्ती बोलताना मूळ विषय सोडून भलतेच बोलून विषय भरकवटू लागली की प्रमाण मराठीत त्याला ‘फाटे फोजणं’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. महाराष्ट्रातल्या काही भागात त्याला ‘फनगाडं फोडणं’ म्हटलं जातं. खूप मोठय़ा नसलेल्या तरवडीसारख्या वगैरे झाडांच्या फांद्यांना फनगाडे म्हणण्याची पद्धत आहे. अशा लहान वनस्पतींच्या फांद्यांना आणखी बारीक बारीक बऱयाच फांद्या असतात. फांद्या आणि फणीचे दात यांच्या दिसण्यातही साम्य आहे.
नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडणाऱयांच्या बॅगेत त्यांची स्वतंत्र फणी असते. घरात मात्र फणी ही सर्वांना नित्य हवी असणारी वस्तू आहे. घरातली एखाद-दुसरी फणी सगळेच वापरत असल्याने जेव्हा ती ठरावीक जागेवर ठेवली जात नाही तेव्हा दुसऱया व्यक्तीला गरजेच्या वेळी सापडेनाशी होते. मग सगळं घर मिळून तिचा शोध घेऊ लागतं. फणीचे असे शोध घेण्याचे प्रसंग प्रत्येकच घरात कधी ना कधी घडलेले असतात. फणीचा शोध घेण्याच्या प्रसंगाला अधोरेखित करणारी एक म्हण मराठीत आहे – फणी कुठं गेली, गेली केस उगवायला! (विंचरायला). कोकणात केस विंचरण्याला ‘केस उगवणं’ म्हटलं जातं.
पूर्वीच्या सुनांना सासूकडून होणाऱया सासूरवासाचे कितीतरी दाखले स्त्रियांच्या ओव्यांतून मिळतात. सुनेप्रति तिरस्कार दर्शवणारा एक गमतीशीर शब्दप्रयोग आहे, जो सून माहेरी जाताना वापरला जात असे – ‘आणा फणकूट, घालू द्या वेणकूट, जाऊ द्या सूनकूट माहेरा.’ सुनेला वेणीफणी करायला फणकूट म्हणजे ओबडधोबड दातांची फणी दिली जात असे. पुढे वेणकूट, सूनकूट या अनुप्रास शब्दांच्या साखळीतून तिरस्काराची घनताही वाढत जाते. फणीसंबंधीच्या या सगळ्या शब्दप्रयोगांतून माणसाची भाषा घडविण्याची विलक्षण प्रक्रिया ठळकपणे जाणवत राहते.































































