
नगरपालिका निवडणुकीत प्रचारादरम्यान एकमेकांविरुद्ध विखारी टीका करणारे भाजप आणि एमआयएम सत्तेतील वाटय़ासाठी एकत्र आले आहेत. अचलपूर नगरपालिकेत या दोन्ही पक्षांनी एकत्र येत विविध समित्यांचे सभापती आणि सदस्यांच्या निवडीचा बिनविरोध प्रयोग केला आहे.
अचलपूर नगरपालिकेच्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीच्या वेळी भाजपने वेगळीच रणनीती आखली. विविध विषय समित्यांचे सभापती तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध पद्धतीने व्हावी यासाठी चक्क एमआयएमसोबत मतैक्य केले. यामुळे एक सभापतीपद एमआयएमच्या वाटय़ाला आले. अचलपूरच्या नगराध्यक्षपदी पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. नगरपालिकेच्या 41 पैकी 15 जागा जिंकून काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला 9 जागा मिळाल्या. तीन जागांवर एमआयएमचे, तर राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या असून 10 अपक्ष निवडून आले आहेत.
नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या खुर्शीदा बानो शाह यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर बांधकाम समितीची जबाबदारी महाआघाडीच्या दीपाली जवंजाळ यांच्याकडे सोपविण्यात आली.
आरोग्य समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शमशेर खान यांची निवड झाली. शिक्षण समितीच्या सभापतीपदी एमआयएमच्या रुखसाना बी. मोहम्मद ईसा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नियोजन समितीच्या सभापतीपदी अपक्ष दर्शना मोहनसिंह ठाकूर यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या दुर्गा सोनापुरे यांची निवड करण्यात आली आहे.

























































