
मुंबई, दिल्लीसह देशभरात थंडीचा कडाका वाढला असतानाच आता हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पुढील 24 तासांत नऊ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच काही ठिकाणी ताशी 60 ते 65 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टीसह उत्तर हिंदुस्थानातील 17 शहरांमध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि कश्मीर, लडाख या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात 40 ते 65 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी केला आहे. तसेच 25 आणि 26 जानेवारी रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये तसेच 26 जानेवारी रोजी केरळ आणि माहेमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

























































