महूमध्ये दूषित पाण्यामुळे 25 जणांना बाधा; 19 मुलांची प्रकृती खालावल्याने खळबळ

इंदूरच्या भागीरथपुरानंतर आता महू तहसील मुख्यालयातील पट्टी बाजार परिसरात दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून या भागात कावीळ, टायफॉइड आणि इतर जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, यामध्ये 19 मुलांसह सुमारे 25 जणांना लागण झाली आहे. अनेक बालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून नळावाटे अत्यंत घाणेरडे, दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणी येत आहे. विशेष म्हणजे, पाणी उकळल्यानंतरही भांड्यांच्या तळाशी मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच एसडीएम राकेश परमार आणि तहसीलदार विवेक सोनी यांनी तातडीने पट्टी बाजार गाठले. यावेळी अधिकाऱ्यांनी एका घरातून पाणी मागवून स्वतः त्याची गुणवत्ता तपासली. या गंभीर प्रकारानंतर त्यांनी पाणीपुरवठा विभागाला तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत.

आरोग्य विभागानेही या प्रकरणी सतर्कता दाखवत बीएमओ डॉ. योगेश सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदर मार्ग आणि मोतीमहल भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. वैद्यकीय पथकाकडून रुग्णांचे नमुने घेतले जात आहेत. स्थानिकांच्या मते, नर्मदा जलवाहिनीची पाईपलाईन अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्यांमधून जाते. या पाईपलाईनमध्ये गळती होऊन सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. पाणी उकळूनही स्वच्छ होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी गळती शोधली नसली तरी, शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.