
उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट असून पर्वतीय भागात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. नवीन नोंदणी देखील स्थगित करण्यात आली आहे. प्रतिकूल हवामान, निसरडे मार्ग आणि नैसर्गिक आपत्तीची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीसाठी हा निर्णय घेतला आहे.
उत्तर हिंदुस्थानात अनेक डोंगराळ भागात थंडी वाढली असून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जम्मू आणि कश्मीरमधील जनजीवन ठप्प झाले आहे. या बदलत्या हवामानाचा त्रिकुटा टेकड्यांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैष्णोदेवी मंदिराची यात्रा थांबवावी लागली आहे.
गुरुवारी रात्रीपासून माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात पाऊस पडत आहे. तसेच शुक्रवारी सकाळी पुन्हा बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रेसाठी नवीन यात्रेकरूंची नोंदणी थांबवण्यात आली आहे. त्रिकुटा टेकड्यांवर सतत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे मार्ग निसरडे झाले आहेत, ज्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे.
पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका वाढतो. हे लक्षात घेत श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने तीर्थयात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ३६ तास जम्मू आणि कश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी तसेच मैदानी भागात पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने अनेक ठिकाणी मुसळधार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे.


























































