
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. त्या पोस्टसोबतच मोदींनी बाळासाहेबांसोबतचे जुने फोटो शेअर केले आहे.
”महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलाला आकार देणारे महान व्यक्तीमत्त्व बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करतो. धारदार बुद्धीमत्ता, शक्तिशाली वक्तृत्व आणि कोणत्याही बाबतीत तडजोड न करण्याची वृत्ती असलेल्या बाळासाहेबांचा लोकांशी एक वेगळे नाते होते. राजकारणासोबतच बाळासाहेब हे संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेबाबतही फार पॅशनेट होते. व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे समाजातील बारिक बारिक गोष्टींवर लक्ष असायचे व त्यातून ते निर्भिडपणे विविध विषयांवर आपले मत मांडायचे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांची जी दूरदृष्टीतून आम्हाला आजही प्रेरणा मिळते व तो विकास करण्यासाठी आम्ही काम करत राहू”, असे मोदींनी ट्विट केले आहे.


























































