
हिंदुस्थानातील खरा चेहरा गावांमध्ये दिसतो, असे नेहमी सांगितले जाते. मात्र केंद्र सरकारच्या ताज्या उपभोग खर्च सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील एक गंभीर आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे. ग्रामीण हिंदुस्थानात शिक्षणावर होणाऱ्या खर्चापेक्षा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर अधिक पैसा खर्च केला जात असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
घरगुती उपभोग आणि खर्च सर्वेक्षण (Household Consumption and Expenditure Survey – HCES) नुसार ग्रामीण कुटुंबे त्यांच्या एकूण खर्चापैकी केवळ 2.5% खर्च शिक्षणावर करतात, तर तब्बल 4% खर्च तंबाखूजन्य पदार्थांवर, विशेषतः गुटख्यावर केला जातो. 1 फेब्रुवारीपासून तंबाखूच्या किमती वाढण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे सरकार सार्वजनिक आरोग्य सेवांचा विस्तार करत आहे. अशा वेळी हे सर्वेक्षण समोर आले आहे.
गेल्या दशकभरात तंबाखूच्या वापरात सातत्याने वाढ होत असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2011-12 ते 2023-24 या कालावधीत ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती तंबाखूवरील खर्चात 58% वाढ झाली असून शहरी भागात ही वाढ 77% इतकी आहे. सध्या ग्रामीण भागात दरमहा प्रतिव्यक्ती खर्चाच्या सुमारे 1.5% आणि शहरी भागात 1% खर्च तंबाखूवर होत आहे.
ग्रामीण हिंदुस्थानात तंबाखू वापरणाऱ्या कुटुंबांची संख्या 2011-12 मध्ये 9.9 कोटी (59.3%) होती, ती 2023-24 मध्ये 13.3 कोटींवर (68.6%) पोहोचली आहे. म्हणजेच अवघ्या दशकभरात 33% वाढ झाली आहे. शहरी भागात ही वाढ आणखी वेगवान असून तंबाखू वापरणारी कुटुंबे 2.8 कोटींवरून 4.7 कोटींवर पोहोचली आहेत. शहरी भागातील तंबाखू वापरणाऱ्या कुटुंबांचा वाटा 34.9% वरून 45.6% झाला आहे.
सर्वेक्षणानुसार तंबाखूचा वापर आता केवळ काही विशिष्ट प्रांतांपुरता किंवा सामाजिक गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. ग्रामीण भागात गुटखा आणि पानतंबाखूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, तर शहरी भागात सिगारेटचा वापर वेगाने वाढत असून गुटखाही झपाट्याने पसरत आहे.
या सर्वेक्षणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गुटख्याचा वाढता प्रभाव. ग्रामीण भागात गुटखा वापरणाऱ्या कुटुंबांचा वाटा 5.3% वरून थेट 30.4% पर्यंत वाढला आहे. सध्या ग्रामीण भागातील एकूण तंबाखू खर्चापैकी 41% खर्च गुटख्यावर होत असून तो सर्वाधिक वापरला जाणारा तंबाखूजन्य पदार्थ ठरला आहे. शहरी भागात सिगारेट अजूनही सर्वाधिक वापरली जात असली तरी 16.8% शहरी कुटुंबे गुटखा वापरत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
गुटख्याचा भौगोलिक विस्तारही चिंताजनक आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये गुटख्याचा वापर राष्ट्रीय ग्रामीण सरासरी 30% पेक्षा जास्त आहे. मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात जवळपास 60% कुटुंबे गुटखा वापरतात, तर उत्तर प्रदेशात ही टक्केवारी 50% च्या पुढे आहे.
या राज्यांतील शहरी भागही हळूहळू याच दिशेने जात असल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेशातील शहरी भागात जवळपास निम्मी कुटुंबे गुटखा वापरतात, तर उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये एक-तृतीयांशाहून अधिक शहरी कुटुंबांमध्ये गुटख्याचा वापर आढळतो. ईशान्य हिंदुस्थानातील काही राज्यांतही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत गुटख्याचा वापर सरासरीपेक्षा जास्त आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुलनेने कमी वापर दिसून येतो, मात्र तिथली आकडेवारीही चिंताजनकच आहे. कर्नाटकात प्रत्येक चारपैकी एक ग्रामीण कुटुंब गुटखा वापरत आहे.
या सर्वेक्षणातून गरिबी आणि तंबाखू वापर यांच्यातील ठोस संबंधही समोर आला आहे. ग्रामीण भागातील सर्वात खालच्या 40% उत्पन्न गटातील 70% पेक्षा अधिक कुटुंबे तंबाखू वापरतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांत हा आकडा 85% च्या पुढे आहे.
गरीब ग्रामीण कुटुंबे त्यांच्या मासिक खर्चापैकी सरासरी 1.7% खर्च तंबाखूवर करतात, तर सर्वाधिक श्रीमंत 20% कुटुंबांमध्ये हा खर्च 1.2% आहे. शहरी भागातही अशीच तफावत दिसून येते. शहरी भागातील खालच्या 40% उत्पन्न गटातील निम्म्याहून अधिक कुटुंबे तंबाखू वापरतात, तर श्रीमंत गटात हे प्रमाण 37% पेक्षाही कमी आहे.

























































