चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, यंदा अकरा दिवस आधीच यात्रेला होणार प्रारंभ

उत्तराखंडच्या प्रसिद्ध चारधाम यात्रेबाबत भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. चारधाम यात्रा मागच्या वर्षीच्या तुलनेत अकरा दिवस आधी सुरू होत आहे. यात्रेला 19 एप्रिल रोजी अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडून चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे. मागच्या वर्षी चारधाम यात्रा 30 एप्रिलला सुरू झाली होती. मात्र, यावेळी ही यात्रा 19 एप्रिलला सुरू होणार आहे.

यात्रेचा कालावधी वाढल्याने देश आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांना अधिक वेळ मिळणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक आणि व्यापाऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिलेले नाही. शिवाय या अतिरिक्त कालावधीमुळे पर्यंटन व्यावसायातही चांगला फरक पडेल असे म्हटले आहे.

चारधाम यात्रेच्या शुभारंभासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्च शुभ मानला जातो. शास्त्रानुसार, यादिवशी केलेले दान, जप आणि पुण्य कर्म फलदायी असतं. याच दिनापासून सतयुग आणि त्रेतायुगचा आरंभ मानला जातो. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया आणि गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे उघडण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. कारण तो दिवस नवा आरंभ आणि समृद्धीचे प्रतिक आहे.