बदलापूरच्या घटनेने राज्याच्या अब्रुची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली, लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका – हर्षवर्धन सपकाळ

बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व कायदा हतबल झाल्याचे दिसत आहेत. राज्यकर्त्यांमध्ये गुन्हेगारांवर कारवाई करण्याची धमकच राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला लाभलेले आतापर्यंतचे सर्वात निष्क्रीय, अकार्यक्षम व बेजबाबदार मुख्यमंत्री आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत असताना राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांना झोप कशी लागते. दीड वर्षापूर्वी बदलापुरात लहान शाळकरी मुलींवर अशीच घटना घडली होती पण सरकारने या प्रकरणातील महत्वाच्या आरोपींना मोकळे सोडले. भाजप व संघाशी संबंधित शाळेत घडलेल्या या घटनेत शाळेच्या अध्यक्ष व सचिवावर कारवाई केली नाही. जनतेने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्यानंतर सरकारला खडबडून जाग आली होती पण पुढे या प्रकरणाचे काय झाले, हे राज्याने पाहिले आहे. प्रशासन कामच करत नाही त्यामुळे गुन्हेगारांचे मनौधैर्य वाढले आहे. काल बदलापुरात झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारने कठोर कारवाई करावी, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांना भाजपच्या माजी खासदाराच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करावी लागली पण या प्रकरणातही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर कसलीच चौकशी न करता क्लिन चिट देऊन टाकली. अंकिता भंडारी, उन्नाव बलात्कार, महिला कुस्ती खेळाडूंवरील लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकरणात दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपशी संबंधित लोक असल्याचे स्पष्ट झालेले आहे पण कारवाई मात्र केली जात नाही. भाजप महायुती सरकारमध्ये आका, खोके, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, लँड माफिया यांना मोकळे रान आहे. महिला व मुलींची सुरक्षा तर रामभरोसे आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.