वेब न्यूज – सोनेरी ग्रासबर्ग

>> स्पायडरमॅन

सोन्यावर प्रेम न करणारा हिंदुस्थानी मनुष्य शोधून सापडायचा नाही. सोन्याचे नाव जरी निघाले तरी आपले डोळे सोन्यासारखे चमकायला लागतात. सध्या जोमाने वाढत्या भावामुळे आणि जगातील प्रमुख देशांच्या जोमाने होत असलेल्या खरेदीमुळे सोने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एकेकाळी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघत असे म्हणतात. धुराचे माहिती नाही, पण कर्नाटकातील हुट्टी, कोलार, आंध्र प्रदेशातील जोंनागिरी, रामगिरी अशा सोन्याच्या खाणींनी मात्र देशाला संपन्न बनवण्यात नक्की हातभार लावलेला आहे. आपल्या ह्या खाणींप्रमाणेच जगात सर्वात प्रसिद्ध अशी सोन्याची खाण आहे, ती म्हणजे इंडोनेशियातील पापुआ प्रांतात असलेली ग्रासबर्ग खाण.

ग्रासबर्ग खाणीला स्वतःचा एक विमानतळ आणि बंदरदेखील आहे. यावरून तुम्हाला या खाणीच्या संपन्नतेची आणि भव्यतेची कल्पना करता येईल. इथे दरवर्षी अंदाजे 48 टन सोन्याचे उत्खनन होते. विशेष म्हणजे, या खाणीत सोन्याच्या जोडीने चांदी आणि तांबे यासारखे धातूदेखील मिळतात. 2023 सालात तर ग्रासबर्गमधून एका वर्षात 52.9 टन सोने, 190 टन चांदी आणि 6,80,000 टन तांब्याचे उत्खनन करण्यात आले होते. सध्या ह्या खाणीत 20000 कामगार कार्यरत आहेत. ह्या कामगारांच्या राहण्यासाठी घरे, शाळा, विविध वस्तूंची बाजारपेठ आणि हॉस्पिटलदेखील याच परिसरात वसवण्यात आले आहे.

ग्रासबर्ग ही भव्य खाण इंडोनेशियाचा सर्वात उंच पर्वत पुंकाक जयाच्या पायथ्याशी वसलेली आहे. हा सर्व परिसर टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे तयार झाला असल्यानं तो विविध महत्त्वाच्या धातूंनी संपन्न असा प्रदेश मानला जातो. सध्या हा खाणीच्या पृष्ठभागावरील धातू पूर्णपणे बाहेर काढण्यात आला असून, जमिनीच्या खोल भागात उत्खनन करण्यात येत आहे. सर्वात प्रथम डच भूगर्भशास्त्रज्ञ जीन-जॅक डोझी यांनी 1936 मध्ये येथे खनिजे शोधून काढली. त्यानंतर 1960 च्या दशकात फ्रीपोर्ट मॅकमोरॅनला खाणकामाचे अधिकार देण्यात आले आणि इथे अधिकृतरीत्या खाणकाम सुरू करण्यात झाले.