
>> दिलीप ठाकूर
आपण ज्या दिग्दर्शकाकडे या दृश्य माध्यमातील पटकथा आणि संकलनाच्या गोष्टी शिकलो, त्याच दिग्दर्शकाच्या शैलीतील चित्रपट आपण पडद्यावर आणावेत असे वाटणारे काही दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अजय कश्यप असेच होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील व्यावसायिक मनोरंजक चित्रपट दिग्दर्शनात अजय कश्यप हेही एक पहिल्या फळीतील दिग्दर्शक होते. आपल्या कारकीर्दीची सुरुवात त्यांनी दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आणि त्यात ते चित्रपट माध्यम आणि व्यवसायातील अनेक गोष्टी शिकले. नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘सनम तेरी कसम’ (कमल हसन, रिना रॉय), ‘कच्चे हिरे’ (फिरोज खान, डॅनी डेन्झोप्पा), ‘ताकद’ (विनोद खन्ना, परवीन बाबी) या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना मोठे कलाकार कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याबाहेर कसं वागतात, त्यांच्याशी आपण कसे वागायचे हेदेखील शिकल्याने अजय कश्यपला दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे काम सुरू करताना एक वेगळा आत्मविश्वास होता. कायमच देमार घेमार, ढिश्यूम ढिश्यूम, मारधाड, अॅक्शन चित्रपटच दिग्दर्शित करायचे हे अजय कश्यपने जणू ठरवूनच टाकले आणि आपला फोकस कायम ठेवला.
अजय कश्यपचा पहिला चित्रपट होता ‘जान की बाजी’ (1985). या चित्रपटाची पूर्वतयारी सुरू असतानाच संजय दत्त अमेरिकेत जाऊन आला होता आणि त्याला एका सुपरडुपर हिट चित्रपटाची आवश्यकता होती. अजय कश्यपने त्याच्यावर विश्वास दाखवला. अनिता राजला नायिका म्हणून निवडले. संजय दत्तने या संधीचा फायदा उठवण्यासाठी कसून मेहनत घेतली. चित्रपट प्रदर्शित होत असताना अजय कश्यपने या चित्रपटाचे मुंबईतील मुख्य चित्रपटगृह अलंकार येथे स्वतः जाऊन आपल्या चित्रपटाला रसिकांचा आगाऊ तिकीट विक्रीसाठी प्रतिसाद कसा आहे हे आवर्जून पाहिले आणि मग फर्स्ट डे फर्स्ट शोलाही हाऊसफुल्ल गर्दीत स्वतः सहभागी होत आपल्या पहिल्या चित्रपटाचे यश प्रेक्षकांसह अनुभवले. चित्रपट लोकप्रिय ठरला आणि अजय कश्यपच्या दिग्दर्शनातील ‘मेरा हक’ (1986), ‘नामोनिशान’ (1987), ‘दो कैदी’ (1989) या चित्रपटांत संजय दत्त हुकमी नायक होता. या दोघांची जोडी छान जमली.
हे सगळे चित्रपट निमशहरी भागात मोठय़ाच प्रमाणावर यशस्वी ठरले. त्या काळातील संजय दत्तच्या यशात अजय कश्यपचाही वाटा आहे. अजय कश्यपने यशस्वी दिग्दर्शक म्हणून जम बसवला आणि ‘दो मतवाले’ (1991), ‘मां’ (1992), ‘साहबजादे’ (1992), ‘द कोल माफिया’ (2012) इत्यादी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पथरिला रास्ता’ (1994) या चित्रपटात दिव्यकुमार हा नवीन चेहरा नायक म्हणून होता आणि वर्षा उसगावकर नायिका होती. यासह डिंपल कपाडिया, सदाशिव अमरापूरकर असे कलाकार होते. अजय कश्यप आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिने पत्रकारांना शूटिंग रिपार्ंटगसाठी आवर्जून आमंत्रित करीत असे. त्यामुळे त्याच्याशी कायमच संवादाची संधी मिळे आणि त्याच्या चित्रपटासह एकूणच चित्रपटसृष्टीची माहिती मिळत असे. आपल्या प्रत्येक चित्रपटासह आपण या व्यवसायात मुरत चाललो आहोत असे तो म्हणत असे. आपल्या काही चित्रपटांच्या मुहूर्त दृश्यात जोरदार संवाद असतील याकडे त्याचा असलेला कटाक्ष हा जणू आपल्या प्रेक्षकांना डागलॉगबाजी फार आवडते आणि त्यात ते टाळ्या, शिटय़ांनी हीरोला प्रोत्साहन देतात याचे जणू भान असे. अजय कश्यप मुख्य प्रवाहातील चित्रपटातील एक यशस्वी दिग्दर्शक होते.































































