
रायपूरच्या शहीद वीर नारायणसिंह स्टेडियमवर हिंदुस्थानच्या इशान किशनने अक्षरशः धुमशान घातले. त्याच्या 76 धावांच्या झंझावाताच्या जोरावर हिंदुस्थानने 209 धावांचे आव्हान केवळ 16 षटकांत पार करत पाहुण्या न्यूझीलंडचा 7 विकेटनी पराभव केला आणि टी-20 मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली.
किशन–सूर्याचा कहर
209 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात अडखळली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा अवघ्या 6 धावांत बाद झाले, मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या इशान किशन आणि सूर्यपुमार यादव यांनी सामना एका झटक्यात न्यूझीलंडच्या हातातून हिसकावून घेतला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची वादळी भागीदारी झाली. इशानने 32 चेंडूंत 76 धावा ठोकल्या, तर सूर्यपुमारने 82 धावांची तुफानी खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. शिवम दुबेने अखेरची औपचारिकता पूर्ण केली. इशान आणि सूर्याने आपल्या खेळीत 8 षटकार आणि 20 चौकार खेचले. झंझावाती इशानच सामनावीर ठरला.
न्यूझीलंडचे द्विशतकी आव्हान
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 6 बाद 208 धावा केल्या. टीम सेफर्ट-का@न्वेने आक्रमक सुरुवात दिली, मात्र मधल्या षटकांत पुलदीप यादवने फिरकीचा अचूक मारा करत किवी डावाचा वेग खुंटवला. रचिन रवींद्रने झुंजार 44 धावा केल्या, तर शेवटी कर्णधार मिचेल सॅण्टनरने नाबाद 47 धावा जोडल्या. तरीही हा डाव हिंदुस्थानी आक्रमणापुढे अपुरा ठरला. सॅण्टनर आणि फुल्क्स 19 चेंडूंत 47 धावांची भर घालत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. पुलदीप यादवने 35 धावांत 2 विकेट टिपल्या.






























































