
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतरही महापौरपदावरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी समर्थकाला महापौरांच्या खुर्चीत बसविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे आमदार सुभाष देशमुख आणि विजय देशमुख यांनी कोठेंविरोधात दंड थोपटत आपल्या समर्थकाची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सोलापूर महापालिकेत भाजपच्या 87 जागा आल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर होणार आहे. महापौरपदासाठी भाजप आमदार कोठे गट विनायक कोंडय़ाल यांच्यासाठी, तर दोन्ही देशमुख डॉ. किरण विजयकुमार देशमुख यांच्या नावासाठी आग्रही आहे. दोघांनाही आपल्याच घरातील माणूस खुर्चीवर बसवायचा आहे. भाजपने घराणेशाहीला विरोध केला तर बिज्जू प्रधाने, अनंत जाधव, नरेंद्र काळे, रंजिता चाकोते यांचा विचार केला जाऊ शकतो.
विष्णुपंत कोठे यांच्या काळापासून मनपावर कोठे घराण्याचे वर्चस्व आहे. आमदार कोठे यांना ही परंपरा चालवायची असून, त्यांच्या गटाचे सर्वाधिक 41 नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही सांगू तोच महापौर, असा कोठे समर्थकांनी आग्रह धरला आहे. n उमेदवार निवडीत डावलल्यामुळे नाराज देशमुख या दोन्ही आमदारांनी सर्व नगरसेवकांचे मत घेऊनच उमेदवार निवडा, अशी भूमिका देशमुख गटाने घेतली आहे.


































































