शिवसेना बेरोजगारांना देणार नोकरीची संधी; शिवसेना भवनमध्ये अभ्यास वर्ग

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये    शिवसेनेच्या माध्यमातून बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिवसेना भवन येथे आठवडय़ातील तीन दिवस अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतील. ज्यामुळे बेरोजगारांना हक्काची नोकरी मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच सध्या बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शिक्षण घेऊनही प्रचंड स्पर्धेमुळे नोकरी मिळणे अवघड बनले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात सद्यस्थितीत जवाहरलाल नेहरू बंदर हे आशियातील सर्वात मोठे बंदर असून या ठिकाणी नोकरीच्या अनेक संधी आहेत. शिवाय मुंबई व नवी मुंबई विमानतळ, गोदामांचे महासंकुल भिवंडी, मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक पट्टा, जहाज कंपन्यांची मुख्यालये, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर योजना, कस्टम क्लिअरिंग, लॉजिस्टिक वेअर हाऊसिंग आदी ठिकाणी असणाऱया नोकऱया मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभ्यासवर्गामध्ये सहभागी होण्यासाठी संचालक शंकर हळदणकर यांच्याशी 9820056102 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तीन महिन्यांचा अभ्यासवर्ग

हा अभ्यासवर्ग तीन महिन्यांचा राहणार आहे. शिवसेना भवन, दुसरा मजला या ठिकाणी सायंकाळी 6 ते रात्री 8.30 या वेळेत हे अभ्यासवर्ग होतील. यामध्ये तज्ञांकडून बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन करण्यात येईल.  या अभ्यासवर्गात एका वेळी 60 युवकांना  प्रवेश देण्यात येईल. गरजेप्रमाणे या तुकडया वाढवण्यातही येतील, अशी माहिती संचालक शंकर हळदणकर आणि शंतनु भडकमकर यांनी दिली.