
ठाणे महापालिका निवडणुका झाल्यानंतर सर्वांचे लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले होते. अखेर हे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सात आणि पनवेल पालिकेत सर्व समाजघटकांना समान संधी मिळाली आहे. त्यामुळे आता ठाणे, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी, भाईंदर, नवी मुंबई, वसई आणि कल्याणमध्ये इच्छुकांनी महापौरपदासाठी लॉबिंग आणि फिल्डिंग सुरू केली आहे.
केडीएमसीत भाजपची बार्गेनिंग पॉवर संपली
कल्याण-डोंबिवली पालिकेचे महापौरपद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. कल्याणचा महापौर भाजपचाच होईल अशी वल्गना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र त्यांच्याकडे एसटी नगरसेवक नसल्याने महापौर निवडीच्या शर्यतीतून भाजप आऊट झाले आहे. सत्तेआधीच भाजपची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. शिंदे गटाने सत्ता स्थापण्यासाठी हालचाली चालवल्या असून अॅड. हर्षाली थवील आणि किरण भांगले महापौरपदासाठी दावेदार आहेत. संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी या दोन्ही नगरसेवकांना शिंदे गटाने अज्ञातस्थळी हलवले आहे.
भिवंडीत तारिक मोमीन यांचे नाव आघाडीवर
भिवंडी पालिकेचे महापौरपद सर्वसाधारण आहे. काँग्रेस पालिकेतील सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे संख्या बळ पाहता बहुमतासाठी अवघे चार सदस्य कमी पडत आहेत. अन्य गटांनी त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. महापौरपदासाठी काँग्रेसचे तारिक मोमीन यांचे नाव चर्चेमध्ये आहे. आमदार रईस शेख यांचे ते निकटवर्तीय आहेत.
वसईत बविआचे आठजण शर्यतीत
वसई सलग चौथ्यांदा वसई-विरार महापालिकेचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. पालिकेत बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे बविआकडून अजीव पाटील, प्रशांत राऊत, पंकज पाटील, नीलेश देशमुख, कन्हैया भोईर, प्रवीण शेट्टी, चंद्रशेखर धुरी, अफिफ शेख यांची महापौरपदासाठी प्रबळ दावेदारी आहे.
मीरा-भाईंदरमध्ये महिलाराज येणार
मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. भाजपच्या नगरसेविका डिंपल मेहता, अनिता पाटील, शानू गोहिल, वर्षा भानुशाली, वंदना पाटील, निला सोन्स, दीपिका अरोरा, स्नेहा पांडे, दीप्ती भट, कुसूम गुप्ता, नयना म्हात्रे, सुनीता जैन यांची नावे प्रामुख्याने आघाडीवर आहेत.
उल्हासनगरात भाजपचाही दावा
वंचितचे दोन आणि साईपक्ष, अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळणाऱ्या शिंदे गटाने महापौरपदासाठी ४० ही मॅजिक फिगर गाठलेली आहे. असे असले तरी महापौर महायुतीचा होईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामळे ३७ जागेवर विजय मिळणाऱ्या भाजपनेही महापौरपदावर दावा केल्याने उल्हासनगरच्या महापौर खुर्चीसाठी चुरस वाढली आहे.
ठाण्यात एससी महापौर, प्रस्थापितांना धक्का
ठाणे महापालिकेत एससी आरक्षण पडल्याने प्रस्थापितांना धक्का बसला आहे. महापौरपदासाठी शिंदे गटाच्या डॉ. दर्शना जानकर, पद्मा भगत, विमल भोईर, गणेश कांबळे यांची नावे आघाडीवर आहेत. ठाणे पालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटाने ७५ जागांवर विजय मिळवला. तर २८ जागेसह भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. युतीमध्ये निवडणूक लढवल्या असल्याने भाजपने दोन वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करत सुरेश कांबळे यांचे नाव जाहीर केल्याने युतीमध्ये नवा पेच वाढला आहे. बहुमत असूनही महायुतीत तणाव आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.




























































