
मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे, स्वाभिमानाची ज्योत मशालीसारखी प्रज्वलित करणारे, महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवतीर्थ येथील स्मृतिस्थळावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शुक्रवारी नतमस्तक झाले. स्मृतिस्थळावर सकाळपासूनच शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी गर्दी केली होती. शिवसेनाप्रमुखांचे यंदाचे वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने पालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. स्मृतिस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या आवडीच्या चाफ्याच्या फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला होता. स्मृतिस्थळावर शिवसेनाप्रमुखांना वंदन करण्यासाठी मोठी रीघ लागली होती. छोटे सैनिक, महिला, ज्येष्ठ शिवसैनिकांनी रांगेत येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून वंदन केले. शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने यावेळी आसमंत दणाणला.



































































