
सध्या राज्याची राजकीय स्थिती बघता शिसारी येईल, असे वातावरण आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखडपणे आपले मत व्यक्त केले. राज्यात गुलामांचा व्यापार सुरू आहे. या गुलामांच्या राज्याचे बादशहा दिल्लीत बसले आहेत, असे सांगत त्यांनी भाजप आणि मिंधे गटावर जोरदार हल्ला चढवला.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष कालपासून सुरू झाले आहे. या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेनेते राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर स्पष्टपणे परखड भाष्य केले. महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण हे शिसारी आणणारे झाले आहे, अशा त्यांच्या विचाराची दिशा होती. इथे गुलामांचा बाजार भरला आहे, असे आम्ही रोज सांगत आहोत.
आता माणसांच्या मताला, जगण्याला आणि विचारांना काहीही किंमत राहिलेली नाही. सर्वकाही भ्रष्ट पैशांतून तोलले जात आहे. भाजपचे मिंध्यासारखे जे मांडलीक राजे आहेत, ते स्वतःला राज्याचे बादशहा समजत या गुलामीच्या बाजारात बोली लावत आहेत. या गुलामांच्या राज्यांचे दोन बादशहा दिल्लीत बसले आहेत. त्यांची गुलामी महाराष्ट्र पत्करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे. सोलापूरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र लढणार असल्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मिंधे गटाबाबत आमच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे असा काही निर्णय होईल, असे आपल्याला वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे एकत्र आले आहेत. आता महाराष्ट्रासाठी आधीचे सर्व विसरुन एकत्र आले पाहिजे, हे राज ठाकरे यांचे विधान महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. दोघांचेही विचार एक आहेत, त्यामुळे आता त्यावर प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रीती संगमामुळे समोर भीतीसंगम निर्माण झाला आहे आणि यापुढेही तो होत राहील. राज ठाकरे आमच्यासोबत आल्याने शिवसेनेचा फायदा झाला, हे आम्ही मोकळेपणाने सांगत आहोत, असेही ते म्हणाले.





























































