
अमेरिकेने हिंदुस्थावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्याचा हिंदुस्थानवर परिणाम होत आहे. मात्र, आता अमेरिकेच्या हिंदुस्थानवरील टॅरिफबाबत अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचा हा टॅरिफ ध्येय साध्य करण्यात यशस्वी झाला आहे. रशियाकडून तेल खरेदी कमी करत ती थांबवण्यात यावी, यासाठी अतिरिक्त टॅरिफ लादण्यात आला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी हिंदुस्थानवर लादलेल्या २५% करबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की हा कर अमेरिकेसाठी यशस्वी झाला आहे. हा कर लागू झाल्यापासून हिंदुस्थानची रशियाकडून तेल खरेदीत लक्षणीय घट झाली आहे. सध्या, हा कर लागू आहे, परंतु अमेरिका तो कायमचा मानत नाही.
स्कॉट बेसंट यांनी संकेत दिले की हिंदुस्थानवर लादलेला २५% टॅरिफ भविष्यात हटवण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ते म्हणाले, जर परिस्थिती अनुकूल असेल आणि वाटाघाटी पुढे सरकल्या तर अमेरिका हिंदुस्थानला शुल्कात सवलत देऊ शकते. तेल व्यापार आणि रशियाशी संबंधित निर्बंधांबाबत जागतिक चर्चा सुरू असताना बेसंट यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आले आहे.
अमेरिकेने सध्या हिंदुस्थानातून येणाऱ्या अनेक वस्तूंवर एकूण ५०% पर्यंत कर लादला आहे. त्यापैकी २५% सामान्य कर आहे. याव्यतिरिक्त, हिंदुस्थानला रशियाकडून तेल खरेदी रोखण्यासाठी दबाव म्हणून अतिरिक्त २५% दंड लादण्यात आला आहे. या दबावानंतर हिंदुस्थानने रशियन तेलाची खरेदी कमी केल्याचा अमेरिकेचा दावा आहे.





























































