
तैवान आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने (MND) शनिवारी वृत्त दिले की सकाळी ६ वाजेपर्यंत, २६ चिनी लष्करी विमाने आणि सहा पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही (PLAN) जहाजांच्या हालचाली तैवानजवळ झालेल्या आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, चीनने पुन्हा एकदा लष्करी दबाव वाढवला आहे. 26 चिनी लढाऊ विमाने आणि 6 नौदलाची जहाजे तैवानजवळ दिसली, त्यापैकी १८ तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडून एडीआयझेडमध्ये घुसली.
तैवान संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, या २६ विमानांपैकी १८ विमानांनी तैवान सामुद्रधुनीच्या मध्यरेषा ओलांडल्या आणि तैवानच्या उत्तर, मध्य आणि नैऋत्य हवाई संरक्षण ओळख क्षेत्रांमध्ये (ADIZ) प्रवेश केला. चीनच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात होते आणि तैवानच्या सशस्त्र दलांनी त्यानुसार प्रतिसाद दिला. शुक्रवारी चीनकडून अशाच प्रकारच्या लष्करी हालचाली करण्यात आल्या होत्या. त्या दिवशी तैवानभोवती एकूण 23 चिनी लढाऊ विमाने उडताना आढळली, त्यापैकी 17 विमानांनी मध्यरेषा ओलांडली आणि ADIZ मध्ये घुसखोरी केली. या विमानांमध्ये J-10 लढाऊ विमान, H-6K बॉम्बर आणि KJ-500 सारखी प्रगत विमानांचा समावेश होता. चीनच्या या हालचालींमुळे तैवानच्या सैन्याला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली की एक चिनी पाळत ठेवणारे ड्रोन नैऋत्य ADIZ मध्ये घुसले आणि प्रतास बेटांकडे (डोंगशा) गेले. ड्रोनने तैवानच्या प्रादेशिक हवाई क्षेत्रातही काही काळासाठी प्रवेश केला, ज्यामुळे बेटावर तैनात असलेल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले. तैवानने या कृतीचा बेजबाबदार आणि चिथावणीखोर म्हणून निषेध केला आहे. तैवानच्या मंत्रालयाने म्हटले आहे की चीनच्या सततच्या लष्करी घुसखोरीमुळे केवळ आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन होत नाही तर संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेला गंभीर धोका निर्माण होतो.
























































