जिथे जिथे SIR, तिथे तिथे मतांची चोरी; हा लोकशाही संपवण्याचा भाजपचा सुनियोजित कट, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुजरात आणि अन्य राज्यांमधील मतदार याद्यांमधील गोंधळावरून भाजप सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला आहे. जिथे जिथे SIR, तिथे तिथे मतांची चोरी होत असून हा लोकशाही संपवण्याचा भाजपचा सुनियोजित कट असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. गुजरातमध्ये इतर राज्यांमध्ये एसआयआरमधून विरोधकांच्या मतदारांना जाणूनबुजून वगळण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत यावर ताशेरे ओढले.

गुजरातमध्ये एकाच नावाचा वापर करून मतदार याद्यांमधील नावांवर हजारो हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया अत्यंत संशयास्पद असून ती मतदारांना वगळण्यासाठी वापरली जात आहे. विशिष्ट वर्ग आणि विशेषतः काँग्रेस समर्थक मानल्या जाणाऱ्या बूथवरील मतदारांची नावे निवडून कापली जात आहेत. जिथे भाजपला पराभवाची भीती वाटते, तिथले मतदारच सिस्टिममधून गायब केले जात आहेत, असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला.

SIR च्या नावाखाली मतदारांचे ‘एक व्यक्ती, एक मत’ हे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. ही लोकशाहीची हत्या असून सत्ता कोण राखणार हे जनता नाही तर भाजप ठरवत आहे. हा पॅटर्न केवळ गुजरातपुरता मर्यादित नाही. यापूर्वी कर्नाटकचे आलंद आणि महाराष्ट्रातील राजुरामध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. आता तोच पॅटर्न गुजरात, राजस्थान आणि ज्या राज्यांमध्ये ‘SIR’ लागू आहे तिथे राबवला जात आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

या प्रकरणात राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगालाही धारेवर धरले आहे. निवडणूक आयोग आता लोकशाहीचा रक्षक राहिलेला नाही, तर या ‘वोट चोरी’च्या कटातील मुख्य सहभागी बनला आहे, अशी कडक शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली.