
मोहम्मद शमीने पुन्हा एकदा आपल्या घातक गोलंदाजीने विरोधी संघाच्या बत्या गुल केल्या आहेत. हिंदुस्थानी संघापासून बऱ्याच दिवसांपासून लांब असलेला मोहम्मद शमी निवडकर्त्यांना आपल्या गोलंदाजीची वारंवार झलक दाखवत आहे. त्याची आग ओकणारी गोलंदाजी फलंदाजांना पेचात पाडण्यात यशस्वी ठरत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेसविरुद्ध खेळताना त्याने दुसऱ्या डावात पाच फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला. त्यामुळे पहिल्या डावासह दुसऱ्या डावातही सर्व्हिसेसची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली.
रडारड केली आणि अंगाशी आली! ICC ने केली बांगलादेशची T-20 वर्ल्डकपमधून हकालपट्टी
रणजी ट्रॉफी एलिट ग्रुप क मध्ये बंगालविरुद्ध सर्व्हिसेस सामना खेळला जात आहे. सर्व्हिसेसने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि बंगालला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बंगालने आपल्या पहिल्या डावात 519 धावा चोपून काढल्या. प्रत्युत्तरात सर्व्हिसेसचा पहिला डाव अवघ्या 186 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात मोहम्मद शमीने दोन विकेट घेतल्या होत्या. फॉलोऑनची परिस्थिती ओढावल्यामुळे सर्व्हिसेसला आपल्या दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरू करावी लागली. दुसऱ्या डावात मोहम्मद शमीने अचूक मारा करत सर्व्हिसेसचा अर्धा संघ बाद केला. तिसऱ्या दिवसाअखेर सर्व्हिसेसने 8 गड्यांच्या मोबदल्यात 231 धावांपर्यंत मजल मारली असून 102 धावांनी ते अजूनही पिछाडीवर आहेत.

























































