निवडणुका होताच मिंध्यांनी घातली लाथ; मराठी तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकता नाही! गुलाबराव पाटलांचे सडके विचार

नगर परिषदा, महापालिका निवडणुका होताच मिंध्यांनी मराठी माणसाच्या कंबरेत लाथ घालून बिहारी माणसाचे तोंडफाटेस्तोवर कौतुक केले. ‘मराठी तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकताच नाही, मुळात काम करण्याची वृत्तीच मराठी माणसात उरली नाही. उलट इथे येऊन पोट भरणाऱ्या बिहारी माणसावर आपण टीका करतो…’ असे सडके विचार राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आहेत! ‘कुणाला माझ्या बोलण्याचा राग आला तरी चालेल, आता निवडणुका चार वर्षांनी आहेत!’ अशी माजोरीही त्यांनी दाखवली.

जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना मिंध्यांचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मराठी माणूस, मराठी तरुणांबद्दल अतिशय संतापजनक विधान केले. मराठी तरुणांमध्ये काम करण्याची मानसिकताच राहिली नाही, त्यांच्यात काम करण्याची वृत्तीच उरली नाही आणि आपण निष्कारण इथे येऊन पोट भरणाऱ्या बिहारी माणसावर टीका करतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले. माझ्या बोलण्याचा कुणाला राग आला, तरी मला त्याची पर्वा नाही, कारण आता निवडणुका चार वर्षांनी आहेत, अशी मग्रुरीही त्यांनी दाखवली.

अंबानी मोठे झाले अशा गप्पा आपण मारतो. अंबानी हे शून्यातून कसे मोठे झाले याची चर्चा करतो. तुम्हाला काय अडचण आहे, तुम्हीही प्रयत्न करा, अशी मखलाशीही गुलाबराव पाटील यांनी केली.

इथे येऊन पोट भरणाऱ्या बिहारी माणसावर आपण निष्कारण टीका करतो. कुणाला माझ्या बोलण्याचा राग आला तर आला, आता निवडणुका चार वर्षांनी आहेत.

गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री