
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छानणीची प्रक्रियाही पार पडली. निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये फूट पडली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने मैदानात शड्डू ठोकला आहे. भाजपने ५०, काँग्रेस २५ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गट २४ तर राष्ट्रवादी (अजित पवार) गट ३१ जागा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मोजक्याच ताकतीने जागा लढवत आहे. गतवेळी भाजप युतीची सत्ता होती. मात्र, आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलले असून जिल्ह्यात मोठा पक्ष कोणता, हे ठरवणारी ही निवडणूक होईल, असे चित्र दिसते.
जिल्ह्यातील ६१ जिल्हा परिषद गट आणि १२२ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी ७४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पंचायत समिती गणाच्या १२२ जागांसाठी तब्बल १ हजार २८९ अर्ज होते. त्यापैकी ३८८ अर्ज अवैध ठरले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी १ हजार ६४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपने वाळवा, कवठेमहांकाळ हे दोन तालुके वगळता उर्वरीत सर्व तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जागा लढवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. वाळव्यात महायुतीच्या घटक पक्षांनाही जागा सोडल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी ५० तर पंचायत समितीच्या १२२ पैकी १०२ जागी भाजप उमेदावारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आटपाडी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव या तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा भाजप लढवत आहे. त्यामुळे महायुतीत पूट पडली. शिंदे गटाने भाजपला आव्हान देत जिल्हा परिषदेच्या ३२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय ५० ठिकाणी पंचायत समितीचे उमेदवार जाहीर केले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडूनही भाजपशी आघाडी न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा आणि जत या चार तालुक्यात ताकद लावली आहे. जिल्हा परिषदेसाठी ३१, तर पंचायत समितीसाठी ५८ उमेदवार देण्यात आले आहेत.
मिनी मंत्रालयात सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु असताना महाविकास आघाडीने आव्हान निर्माण केले आहे. काँग्रेसने मिरज, पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यात ताकद लावली आहे. जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसने २५, तर पंचायत समितीसाठी ४९ उमेदवार उभे केले आहेत. जत तालुक्यात भाजप विरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून भाजपविरोधात आघाडी केली आहे. जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने २४, तर पंचायत समितीसाठी ५४ उमेदवार उभे केले आहेत. वाळवा, शिराळा, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी महाआघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी काही जागा सोडल्या आहेत. मिरज तालुक्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.

























































