
एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले इंदापूर तालुक्यातील तीन नेते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार न करता या नेत्यांनी आपली मुलगी, मुलगा आणि कुटुंबातील व्यक्तींनाच तिकीट दिले आहे. यामुळे इंदापुरात कार्यकर्ते वाऱ्यावर आणि नेत्यांची मुले झुल्यावर असे चित्र पाहावयास मिळत आहे.
वरिष्ठ नेते ‘राजकारणात वैर नसते’ म्हणतात, पण कार्यकर्ते मात्र वर्षानुवर्षे प्राणपणाने मेहनत करतात, आपल्या नेत्यांसाठी रात्रंदिवस धावपळ करतात, पक्षासाठी संघर्ष करतात. मात्र, या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक नेते एकत्र येऊन आपल्या मुला-मुलींना, पुतण्यांना आणि कुटुंबातील व्यक्तींना निवडणुकीत उतरवले आहे.
इंदापूर तालुक्यातील या वेळच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांचे चित्र पुरेसे बोलके आणि कार्यकर्त्यांनादेखील विचार करायला लावणारे आहे. जिल्हा परिषदेच्या आठ जागा असलेल्या या तालुक्यातील राजकारणाकडे आणि निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. भरणे यांनी तीन वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. हर्षवर्धन पाटील हे १९९५ मध्ये अपक्ष आमदार झाले. त्यावेळच्या युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री झाले, नंतर काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेस आणि त्यानंतरच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री राहिले. १९१४ मध्ये त्यांचा पराभव भरणे यांनी केला. काँग्रेसमधून ते भाजपमध्ये गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून शरद पवार गटामध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली, त्यातही त्यांचा पराभव झाला.
आता जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे चित्र निर्माण केले गेले तरी प्रत्यक्ष भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कार्यकर्त्यांची नाळ जुळलेली नाही. गावोगाव संघर्ष आहे. असे असतानादेखील ते एकत्र निवडणूक लढवत आहेत. याच तालुक्यातील आप्पासाहेब जगदाळे यांनीदेखील दोन-तीन पक्षांमधून प्रवास केला आहे. अनेकदा भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांबरोबरही त्यांचा संघर्ष राहिला. मात्र, आता तेदेखील जिल्हा परिषद निवडणुकीत दोघांबरोबर एकत्र आहेत.
भरणे यांचा मुलगा श्रीराज पंचायत समिती, हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता जिल्हा परिषदेसाठी, तर आप्पासाहेब जगदाळे यांच्या कुटुंबात जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली. नेत्यांनीच तिकिटे वाटून घेतल्याने कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर पडले आहेत.
भरणे-पाटील यांच्यातील वैर हे फक्त वैयक्तिक नव्हते; ते कार्यकर्त्यांच्या, सहकारी संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती-जिल्हा परिषदेत उतरले होते. आता एका रात्रीत ते ‘मित्र’ झाल्याने कार्यकर्त्यांचे हितसंबंध, विश्वास, निष्ठा यांचे काय? नेते पाहिजे तेव्हा जुळवून घेतात, पण कार्यकर्त्यांचे काय, असा प्रश्न केला जात आहे. याच रागामधून तालुक्यात झेडीपीच्या आठ जागांसाठी ११३, तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी २०९ अर्ज दाखल झाले आहेत. अनेक कार्यकत्यांचा यात समावेश आहे.



























































