
मनपा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून न जाता, हार न मानता पुन्हा नव्या जोमाने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केले.
महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांची शनिवारी बैठक संपन्न झाली. यावेळी दानवे बोलत होते. निवडणूक निकालांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यात आले. प्रचारादरम्यान आलेल्या अडचणी, मतदारांचा प्रतिसाद, संघटनात्मक बलस्थाने व उणिवा यावर सखोल चर्चा करण्यात आली. हा पराभव आमचा शेवट नसून ती नवी सुरुवात असल्याची भावना यावेळी सर्व उमेदवारांनी व्यक्त केली.
आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन, संपर्क मोहिमा आणि संघटन वाढीवर भर देण्यात येणार आहे. आगामी काळात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक ताकदीने मैदानात उतरतील, असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला. खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने पक्षासाठी व सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी काम करा, असे आवाहन शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे, किसान सेना जिल्हा संघटक नानासाहेब पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष खंडके, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, हरिभाऊ हिवाळे, विधानसभा प्रमुख प्रमोद ठेंगडे, शहर संघटक सचिन तायडे, विधानसभा संघटक गिरीश चपळगावकर, महिला आघाडी महानगर संघटक सुकन्या भोसले, हनुमान शिंदे आदींची उपस्थिती होती.


























































