
कल्याण-डोंबिवलीत विरोधी बाकावर बसू, पण ज्यांच्याविरोधात लढलो त्या भारतीय जनता पक्ष आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही, असे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना ही भूमिका स्पष्ट केली. नॉट रिचेबल नगरसेवकांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांनी तेथील सद्यस्थितीबाबत या वेळी उद्धव ठाकरे यांना अवगत केले. या वेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर उपस्थित होते.
कोणत्याही आमिषाला बळी पडू नका अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिल्या. त्यावर सत्तास्थापनेच्या कोणत्याही मोहाला बळी न पडता विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय मान्य असल्याचे नगरसेवकांनी एकमुखाने सांगितले. बैठकीनंतर वरुण सरदेसाई प्रसारमाध्यमांशी बोलले. नॉट रिचेबल नगरसेवकांना व्हिप बजावला जाईल आणि तरीही ते आले नाहीत तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते असेही ते म्हणाले.































































