
राणा पाटील यांचं पोरगं ‘बी’ फॉर्म आणून देतं हे आमचं दुर्दैव. धाराशिव जिल्ह्यातील शिंदे गट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दावणीला बांधला असून त्याची लाज वाटते अशी खदखद व्यक्त करत शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांना एका कार्यकर्त्याने फोनवर झापले. त्याची एक क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
जिह्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. युत्या, आघाडय़ांची चर्चा अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यात भाजप आमदार राणा पाटील व शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यातील वैर जिह्याला परिचित आहे. यातच सध्या जिह्यातील शिंदे गट भाजपच्या दावणीला बांधला असून सर्व सूत्रे आमदार राणा पाटील हलवत आहेत. यामुळे संतापलेल्या एका कार्यकर्त्याने राजन साळवी यांना फोन करून चांगलेच धारेवर धरले.
विधानसभेत धाराशीवची जागा आपण लढली आणि चार-सहा महिन्यांत असे काय झाले की, सगळी सूत्रे राणा पाटील आणि भाजपच्या हातात गेली? धाराशीवमध्ये शिंदे गटाला फक्त दोन बी फॉर्म दिले आहेत. आपले लोक राजकारण सोडून जातील, असा टोलाही त्याने लगावला.



























































