मला सस्पेंड केले तरी चालेल… भाषणात आंबेडकरांचे नाव न घेतल्याने सावित्रीची लेक थेट मंत्र्याला भिडली, महाजनांना विचारला जाब

आज संपूर्ण देशात 77 व्या प्रजासत्ताक दिनेचा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर लष्कराचे संचलन पाहायला मिळाले, तर राज्यातही विविध ठिकाणी मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी ध्वजारोहन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला. मात्र नाशिकमध्ये ध्वजारोहनानंतर मोठा राडा झाला. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एका महिला पोलिसाने गोंधळ घातला. महाजन यांनी भाषणामध्ये घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत महिला पोलिसाने त्यांना जाब विचारला. याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषण सुरू असतानाच वन विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस माधवी जाधव यांनी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप करत महाजनांना जाब विचारला. यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने माधवी जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली.

ज्यांनी देशाला संविधान दिले आणि लोकशाही घडवली, त्या महामानवाचे नाव भाषणातून वगळणे ही फार मोठी चूक आहे. मी पूर्णवेळ वाट पाहत होते की आता तरी बाबासाहेबांचे नाव येईल, पण तसे झाले नाही. या मुद्द्यावर मला निलंबित केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवण्याचे किंवा मातीचे काम दिले तरी मी ते अभिमानाने करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जात असताना मी गप्प बसणार नाही, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून उपस्थित पोलिसांनी तातडीने माधवी जाधव यांना ताब्यात घेतले आहे. पालकमंत्र्यांनी आपली चूक मान्य करावी, अशी मागणी यावेळी माधवी जाधव यांनी लावून धरली.