
दैनंदिन व्यवहारात जाणवणारी सुट्टय़ा पैशांची कमतरता दूर करण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू केले जाणार आहेत. सरकार अशा एका मशीनवर काम करत आहे जी मागणीनुसार 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटा जारी करेल. याशिवाय ‘हायब्रिड एटीएम’चा प्रस्तावही विचाराधीन आहे, जो मोठय़ा नोटांचं रूपांतर लहान नोटा आणि नाण्यांमध्ये करेल. तसेच रिझर्व्ह बँकेवर लहान मूल्याच्या नोटा अधिक छापण्यासाठी आग्रह धरण्याचीही योजना आहे.
कमी मूल्याच्या नोटा देणाऱया मशीनच्या प्रोटोटाइपची मुंबईत एका पायलट प्रोजेक्टअंतर्गत चाचणी सुरू असल्याचे समजते. या प्रणालीला मंजुरी मिळाल्यास ती देशभरात लागू केली जाईल. ही मशीन्स रेल्वे स्थानके, मार्पेट, रुग्णालये आणि सरकारी कार्यालये यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी बसवण्यात येतील. यामुळे सुट्टय़ा पैशांवरून होणारे वाद उद्भवणार नाहीत.
मशीन कसे काम करेल?
दैनंदिन व्यवहारात 500 रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मिळवताना दुकानदार आणि ग्राहक दोघांनाही मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून हायब्रिड एटीएम पर्यायाचा विचार केला जात आहे. हायब्रिड एटीएम हे पारंपरिक एटीएम आणि कॉइन वेंडिंग मशीनचे एकत्रित रूप असेल. या मशीनद्वारे युजर्स मोठय़ा नोटा टाकून त्या बदल्यात लहान नोटा आणि नाणी मिळवू शकतील.
किती नोटा चलनात
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, चलनात असलेल्या एकूण चलनापैकी 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण 41.2 टक्के आहे, तर मूल्याच्या बाबतीत त्यांचा हिस्सा 86 टक्के इतका जास्त आहे. याउलट लहान मूल्याच्या नोटा (2, 5, 10, 20 आणि 50 रुपये) चलनाच्या एकूण प्रमाणात 38 टक्के असल्या तरी एकूण मूल्यामध्ये त्यांचा वाटा केवळ 3.1 टक्के आहे. उर्वरित हिस्सा 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचा आहे.


























































