
मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जंक्शन येथे सिवनी- बैतुल विशेष प्रवासी ट्रेनचा मोठा अपघात सुदैवाने टळला. नियोजित वेळेनुसार सकाळी 8 वाजता छिंदवाडा स्टेशनवरून बैतुलकडे रवाना झाली. ट्रेनचा वेग वाढताच स्टेशनपासून थोडय़ा अंतरावर असलेल्या चार गेटजवळ अचानक तीन प्रवासी डबे चालत्या इंजिनपासून वेगळे झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी धक्का जाणवल्याचे सांगितले, तर मोठय़ा आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते जर ही घटना थोडी दूर किंवा जास्त वेगाने घडली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने, ट्रेनचा वेग कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित होते. डबा वेगळे झाल्याची माहिती मिळताच रेल्वेचे तांत्रिक, अभियांत्रिकी आणि ऑपरेशन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

























































