Baramati Plane Crash – दोन दिवसांपूर्वीचा दौरा ठरला अखेरचा, अजित पवार यांच्या निधनाने नांदेडकर शोकाकूल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांचा मराठवाड्याचा शेवटचा दौरा हा नांदेडला झाला आणि दोन दिवसानंतर त्यांचे हे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या आठवणीत नांदेडकर शोकाकूल झाले आहेत.

अजित पवार यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांसह संबंध राजकीय व सामाजिक सृष्टीला हा मोठा धक्काच बसला. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी 25 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता नांदेडच्या विमानतळावर त्यांचे आगमन झाले. मुख्यमंत्र्यांना येण्यास वेळ असल्याने विमानतळवरील स्वागत स्विकारून अजित पवार हे शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. काही काळ तेथे विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी दुपारी अडीच वाजता नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा येथे जावून दर्शन घेतले. त्याठिकाणी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यकर्त्यांशी व भाविकांशी चर्चा करुन ते कौठा येथील असर्जन भागातील मुख्य कार्यक्रमाकडे रवाना झाले. ते आल्याचे पाहून अनेकांना आनंद झाला. तब्बल 16 मिनिटे त्यांनी मराठी व हिंदीतून भाषण केले. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या बलिदानाचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करुन त्यांनी केलेले भाषण अभ्यासपूर्ण होते. निवेदकाने त्यांच्या भाषणाअगोदरच अजित पवारांना मराठी आणि हिंदीतून अशा दोन्ही भाषातून आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली. त्यांनी तो शब्द पाळला. त्यानंतर साडेपाच वाजता ते विमानतळावर आले आणि सर्वांचा निरोप घेवून पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.

मराठवाड्यातील अजित पवारांचा हा शेवटचा दौरा असेल तोही नांदेडला. या दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशीच त्यांचे अपघाती निधन होईल असे कुणालाही वाटले नाही. गेल्या चार महिन्यात अजित पवारांनी नांदेडला तब्बल पाच वेळा भेटी दिल्या. नगर परिषद प्रचार सभा तसेच त्याअगोदर तीन वेळा विविध मान्यवरांच्या प्रवेशाच्या वेळी त्यांनी घेतलेल्या सभा आजही सर्वांना आठवणीत राहतील. प्रत्येक कार्यकर्त्यांशी आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या समस्या सोडविणे तसेच सार्वजनिकरित्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा निपटारा करणे ही अजित पवारांची खासियत होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आधारवड कोसळला – आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

विलासराव देशमुख गेल्यानंतर राजकीयदृष्ट्या पोरका झालेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आश्रय देणारा आणि पाठबळ देणारा पहिला नेता अजित दादा होते. त्यानंतर दुसर्‍यांदा राजकीय अडचणीच्यावेळी विधानसभेची उमेदवारी देवून मला त्यांनी राष्ट्रवादीचा आमदार केले. कडक शिस्तीच्या दादाचं मन मेनापेक्षा महू असल्याचा अनुभव गेल्या दीड वर्षात आला. दादा अचानक गेले, माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आधारवड कोसळला. दादा गेले हे कळताच धक्का बसला या घटनेवर विश्वास बसला नाही, टिव्ही पाहिला आणि आकाशच कोसळले, अशा भावना राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केल्या.

राज्याने कर्तबगार व अनुभवी नेतृत्व गमावले – खा. अशोकराव चव्हाण

माझे अनेक वर्षांचे सहकारी, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि तितकीच धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक कर्तबगार व अनुभवी नेतृत्व गमावले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याच्या अनेक क्षेत्रांवर त्यांची अमीट छाप आहे. प्रश्नांची सखोल जाण, खंबीर निर्णयक्षमता, प्रशासकीय कौशल्य आणि परखड वक्तृत्वशैलीसाठी ते परिचित होते. अजित पवार यांचे निधन माझी वैयक्तिक हानी आहे. मागील अनेक वर्ष आमचे राजकारणापलिकडचे मैत्रीचे संबंध होते. ते कायम स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले अजितदादा पवारांचे सहकारी सहप्रवासी आणि वैमानिक दलातील सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.