
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते. काटेवाडीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
अजित पवार यांच्या पार्थिवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून धार्मिक विधी करण्यात आले. पार्थ पवार यांनी पार्थिवाला अग्नी दिला. संपूर्ण पवार कुटुंब यावेळी उपस्थित होते. अंतिम विधी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी शोक अनावर झालेल्या कार्यकर्त्यांनी अजितदादा परत या असा टाहो फोडला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात लाखोंच्या जनसमुदाय उपस्थित होता. शोकाकुल वतावरणात अजित पवार यांचे पार्थिव बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झाले आणि अंत्यविधींना सुरूवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.


























































