
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी जाहीर केला असून १० फेब्रुवारी रोजी महापालिकेची विशेष सभा महापौर निवडीसाठी घेतली जाणार आहे. या निवडीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डीले हे राहणार आहेत.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्यांच्या ४५ जागा निवडून आल्या आहेत. एमआयएमच्या १५, काँग्रेसच्या १०, वंचित बहुजन आघाडीच्या ५, शिंदे गटाच्या ४ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ तर अपक्षांना एक असे पक्षीय बलाबल आहे. १९९७ साली नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे सुधाकर पांढरे हे निवडून आले होते. त्यानंतर सातत्याने काँग्रेसने या महापालिकेवर वर्चस्व सिद्ध केले. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजपाने सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
यामुळे भारतीय जनता पक्षाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. यापूर्वी काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी सव्वा-सव्वा वर्षाचा महापौर केला होता. तीच पध्दत यावेळी राबविली जाणार का? याकडे नांदेडकरांचे लक्ष लागून आहे. महापौर पदासाठी भाजपाच्या वतीने ज्योती कल्याणकर, सुदर्शना खोमणे, कविता मुळे, शांभवी साले, वैशाली देशमुख, कविता गड्डम, रुची भारतीय, मनप्रितकौर कुंजीवाले यांची नावे चर्चेत आहेत.






























































