
अमेरिका आणि इराणमधील संबंध कमालीचे बिघडले असून दोन्ही देशात कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महाकाय युद्धनौका इराणच्या दिशेने धाडली आहे. ‘इराणकडे आता फार थोडा वेळ आहे. त्यांनी वाटाघाटीस नकार दिल्यास किंवा आमच्या मागण्या मान्य न केल्यास थेट हल्ला करणार,’ अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे आम्हाला धोका असल्याची हाकाटी पिटत सप्टेंबर महिन्यात इस्रायलने हल्ला केला होता. त्यास इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलला साथ देत इराणमध्ये हल्ले केले. इराणने अमेरिकेलाही प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून एक पाऊल मागे घेतल्याने पुढील संघर्ष टळला. मात्र तेव्हापासून अमेरिका इराणला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही इराणने आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. अलीकडे इराणमध्ये सरकारविरोधात झालेल्या देशव्यापी आंदोलनाला अमेरिकेने थेट पाठिंबा जाहीर केला होता. तसेच, इराणमधील सरकार उलथवण्याची तयारी केली होती. मात्र, इराण बधले नाही. त्यामुळे ट्रम्प अधिकच संतापले आहेत.
ट्रम्प यांना काय हवे?
अमेरिकेने आता इराणशी नव्याने अणुकरार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दोन्ही देशांत आधीपासून एक करार आहे, मात्र नवा करार हा जुन्या करारापेक्षा अधिक जाचक आहे. इराणचा अणुकार्यक्रम पुरता रोखणे हा यामागचा उद्देश आहे, इराणचा त्यास विरोध आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत, मात्र ती सन्मानाने व्हायला हवी. ताकद दाखवून चर्चेला बोलवाल तर चालणार नाही, असे इराणने ठणकावले आहे.
आमचेही ट्रिगरवर बोट; इराणचा पलटवार
इराणच्या दिशेने युद्धनौका पाठवल्याची धमकी ट्रम्प यांनी दिल्यानंतर इराणनेही पलटवार केला आहे. ‘आमचे सैन्यही तयार आहे. इराणवरील कोणत्याही हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. आम्हीही बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवून आहोत,’ असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.
US-Iran War News: Trump Deploys Warship as Tensions Escalate | Latest Updates
Tensions rise as US President Donald Trump deploys a massive warship toward Iran. With both nations on the brink of war over nuclear disputes, Iran warns of a strong retaliation. Read the latest updates on the US-Iran conflict.


























































