
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत टेनिसपेक्षा राजकीय तणाव, कटुता आणि वाद अधिक केंद्रस्थानी राहिले. अव्वल मानांकित बेलारूसची एरिना सबालेंका आणि युक्रेनची एलिना स्वितोलिना यांच्यातील उपांत्य सामना म्हणजे जणू कोर्टवरील कोल्ड वॉर असल्यासारखाच तणावाखाली खेळला गेला.
सामना सुरू होण्याआधीच तणावाचा स्फोट
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर वातावरण आधीपासूनच तणावग्रस्त होते. त्यामुळे सामन्यापूर्वीची क्रीडाभावनेची औपचारिकता पूर्णपणे बाजूला पडली. दोघींनी ना हस्तांदोलन केले, ना एकत्र पह्टोसेशन. स्वितोलिनाने सबालेंकापासून जाणीवपूर्वक अंतर ठेवले, तर सबालेंका थेट बॉल गर्लसोबत पह्टो काढत नेटपासून दूर गेली. हा क्षणच पुढील संघर्षाची नांदी ठरला.
कोर्टवर गुणांसोबत मानसिक युद्ध
खेळ सुरू होताच प्रत्येक गुणानंतरचा जल्लोष अधिक आक्रमक, आवेशपूर्ण आणि चिथावणीखोर दिसत होता. शांत, तांत्रिक टेनिसऐवजी कोर्टवर मानसिक दडपणाचा खेळ रंगला.
‘हिंड्रेंस’ वादाने पेट घेतली
सामन्यातील सर्वात मोठा वाद सबालेंकावर दिलेल्या ‘हिंड्रेंस’ कॉलमुळे उभा राहिला. एका पह्रहँड शॉटवर चेंडू सीमारेषेबाहेर गेल्याचा निर्णय लागला. स्वितोलिनाने खेळ सुरू ठेवला, मात्र सबालेंकाने पॉइंट थांबवला. अंपायरने नियमांचा आधार घेत हा नियमभंग ठरवला. संतप्त सबालेंकाने तत्काळ व्हिडीओ रिह्यूची मागणी केली. पॉइंटदरम्यान आवाज केल्यामुळे हा हिंड्रेंस आहे, असे अंपायरचे स्पष्टीकरण होते. क्षणभर कोर्टवर तणाव शिगेला पोहोचला होता.
वादांवर मात करत सबालेंकाचा विजय
सर्व गोंधळ, संताप आणि राजकीय छायेला बाजूला सारत सबालेंकाने खेळात वर्चस्व सिद्ध केले. 41 मिनिटे रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये तिने 6-2 अशी सरशी मिळवली.
सामन्यानंतरही कटुता कायम
सामना संपला, पण तणाव संपला नाही. अखेरीसही दोघींनी एकमेकांशी हस्तांदोलन टाळले. टेनिस कोर्टवर उमटलेली ही राजकीय कटुतेची छाया प्रेक्षकांसाठीही अस्वस्थ करणारी ठरली. या सामन्यात खिलाडूवृत्तीला अक्षरशः श्रद्धांजली वाहिल्याचे चित्र उभे राहिले होते.

























































