
सनत संगवानच्या 118 धावांच्या झुंजार शतकानंतरही यजमान मुंबईने दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात दिल्लीचा पहिला डाव 221 धावांत गुंडाळत पहिल्या दिवसावर आपले वर्चस्व राखले. दुखापतीमुळे गेल्या पाचही लढतींना मुकलेल्या मोहित अवस्थीने भेदक पुनरागमन करत आपल्या धारदार गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांना उभेसुद्धा राहू दिले नाही. दुसरीकडे धुळीमुळे निर्माण झालेल्या कमी दृश्यमानतेच्या कारणामुळे दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला. दिवसअखेर मुंबईने 13 धावांत एक विकेट गमावली होती.
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या दिल्लीला सुरुवातीलाच धक्का बसला. तुषार देशपांडेने ध्रुव कौशिकचा त्रिफळा उडवत मुंबईला सुरुवातीचे यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर सनत संगवान आणि वैभव कांडपाल (32) या डावखुऱ्या जोडीने निर्धाराने खेळ करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी 100 धावांची भागीदारी करत मुंबईच्या वेगवान माऱ्याला प्रत्युत्तर दिले. शम्स मुलानीने कांडपालला बाद करत ही भागीदारी फोडली आणि तेथून सामन्याची दिशा बदलली. अवस्थीने अचूक टप्प्यावर मारा करत दिल्लीच्या मधल्या फळीला अक्षरशः उद्ध्वस्त केले. सात चेंडूंत आर्यन राणा, कर्णधार आयुष दोसाजा आणि सुमित माथूर बाद झाल्याने दिल्लीची 2 बाद 146 वरून 5 बाद 152 अशी घसरण झाली.
संगवानने मात्र एकाकी लढत सुरू ठेवत हंगामातील तिसरे शतक झळकावले. चहापानानंतर तो मुलानीच्या चेंडूवर झेलबाद झाला आणि दिल्लीचा शेवटचा आधारही तुटला. अखेर अवस्थीने पाच विकेट घेत दिल्लीचा डाव संपवला. धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावल्याने अनेक मुंबई खेळाडूंनी मास्क घातले, तर दृश्यमानता कमी झाल्याने अर्धा तास वाढवलेला खेळही थांबवण्यात आला. पहिल्या दिवसअखेर मुंबई सामना आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरली आहे.




























































