जिल्हा परिषद निवडणूक – भाजप उमेदवाराला हायकोर्टाने ठोठावला एक लाखाचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषद निवडणुकीत अजितदादा गटाच्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे. त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा या मागणीसाठी याचिका दाखल करणाऱ्या भाजप उमेदवाराला हायकोर्टाने चांगलाच दणका दिला. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत त्याला एक लाखाचा दंड ठोठावला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पल्लवी काळे तर अजितदादा गटाकडून दीपाली जगदाळे यांनी अर्ज दाखल केला. काळे यांनी काही कारणास्तव अर्ज मागे घेतला, मात्र जगदाळे यांनी सरपंच पद भूषवल्याची तसेच निवडणूक अर्ज दाखल करताना मालमत्तेची माहिती लपवून ठेवल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाद मागितली.

निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावल्याने काळे यांनी हायकोर्टात अॅड. शरद भोसले यांच्यामार्फत अपील दाखल केले. या याचिकेवर आज गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासारखे काय आहे असा सवाल केला. मात्र वकिलांना न्यायालयाच्या शंकांचे समाधान करता आले नाही. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले. खंडपीठाने फटकारल्यानंतर याचिका मागे घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती वकिलांनी केली.