
बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. समितीने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे.
अजित पवार यांच्यासह पाच जणांचा या भीषण दुर्घटनेत मृत्यू झाला होता. विमान अपघात तपास शाखेच्या (एएआयबी) पथकाबरोबरच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजी) मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे तीन सदस्यांचे पथक अपघाताच्या दिवशी दुर्घटनास्थळी दाखल झाले होते. एएआयबीच्या महासंचालकांनीही पाहणी केली होती.
नागरी उड्डाण मंत्रालयाने ‘एक्स’वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. सखोल, पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण होणारी चौकशी केली जाईल, असे त्यात म्हटले आहे. दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते विमान होते. विमानाचे एअरफ्रेम, इंजिन लॉगबुक्स, मेंटेनन्स रेकॉर्ड्स, इन्स्पेक्शनचा इतिहास, वर्क ऑर्डर्स, विमानात असलेली कागदपत्रे, क्रूच्या पात्रतेचे रेकॉर्ड्स व अन्य कागदपत्रे चौकशी समितीने डीजीसीएकडून मागवली आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी दृश्यमानतेची स्थिती, वैमानिकाने त्या स्थितीत घेतलेले निर्णय आणि बारामती येथील धावपट्टीवर विमान उतरण्याच्या प्रयत्नात नेमके काय घडले या दिशेने चौकशी केली जाणार आहे.




























































