
‘तौकते’ चक्रीवादळामुळे वांद्रय़ाच्या जम्बो कोविड सेंटरमधून राजावाडी रुग्णालयात हलवताना कोविड रुग्णाच्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीऐवजी नातेवाईकांना वेळेत नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनात दगावलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना किती भरपाई देणार, असा सवाल करत हायकोर्टाने आज राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
एमआरची नोकरी करणाऱया सुनील कुमार यादव यांना कोविड झाल्याने 2 मे 2021 रोजी बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले. ‘तौकते’ वादळामुळे 15 मे रोजी त्यांना राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. 16 मे रोजी सुनील कुमार यांचे निधन झाले. असे असताना 17 मे रोजी राजावाडी रुग्णालयात त्यांना हलवण्यात येणार असल्याचा मेसेज कुटुंबीयांना पाठवण्यात आला. मुलाला दुसऱया ठिकाणी हलवल्याने व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा जीव गेल्याचा दावा करत सुनीलचे वडील रामाशंकर यांनी ऍड. अजय जैस्वाल यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
























































