
अमेरिकेतील राज्य टेक्सासमध्ये आता नवीन एच-1बी व्हिसा जारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबट यांनी पुढील वर्षी मे महिन्यांपर्यंत एच-1बी व्हिसा जारी न करण्याचे निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात टेक्सासच्या सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये ही बंदी लागू होणार आहे. या नव्या आदेशामुळे जवळपास 15 हजार हिंदुस्थानी नागरिकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
टेक्सास वर्कफोर्स कमिशनकडून सर्व एच-1बी व्हिसा धारकांची संख्या, नोकरीची भूमिका, मूळ देश आणि व्हिसाची मुदत याबद्दल 27 मार्चपर्यंत डेटा रिपोर्ट मागवण्यात आला आहे. टेक्सास हे एच-1बी व्हिसा जारी करणारे अमेरिकेतील दुसरे मोठे राज्य आहे. पहिल्या क्रमांकावर कॅलिफोर्निया आहे. अमेरिकेत दरवर्षी हिंदुस्थानींना मिळणाऱ्या जवळपास दोन लाख एच-1बी व्हिसांपैकी 40 हजार टेक्सासमध्ये जारी केले जातात. यापैकी 25 हजार आयटी कंपन्यांसाठी आणि उर्वरित 15 हजार सरकारी कार्यालये व विद्यापीठांसाठी जारी केले जातात. ऑस्टिन विद्यापीठात मोठ्या संख्येने हिंदुस्थानी नागरिक कार्यरत आहेत. 2.77 ट्रिलियन डॉलर जीडीपी असलेले टेक्सास जगातील 8 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ही कॅनडा, इटली, दक्षिण कोरिया, रशिया आणि ऑस्ट्रेलियापेक्षाही मोठी अर्थव्यवस्था आहे. टेक्सासचे ऑस्टिन शहर एक मोठे टेक हब म्हणून ओळखले जाते.
काय आहे एच-1बी व्हिसा
हा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. या व्हिसामुळे परदेशी व्यावसायिकांना विशेष टेक्नोलॉजी कौशल्याची आवश्यकता असलेल्या पदांवर नियुक्ती करता येते. हे आयटी, आर्किटेक्चर आणि आरोग्य यांसारख्या व्यवसायातील लोकांसाठी जारी केले जाते. अमेरिका दरवर्षी 65 हजार लोकांना एच-1बी व्हिसा जारी करते. या व्हिसाची मर्यादा 3 वर्षांपर्यंत असते. गरज पडल्यास ती आणखी तीन वर्षांपर्यंत वाढवता येते.
मुलाखतीच्या तारखा आता पुढील वर्षी
हिंदुस्थानात एच-1बी व्हिसा मुलाखतीसाठी अमेरिकन दूतावासांकडून आता पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्याच्या मुलाखतीच्या तारखा दिल्या जात आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि हैदराबादमधील अमेरिकन दूतावासांमध्ये एच-1बीसाठी सोशल मीडिया तपासणी सुरू आहे. टेक्सास पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत म्हणजेच राज्य संसदेच्या कार्यकाळापर्यंत नवीन व्हिसा देणार नाही.


























































