माघी पौर्णिमेला चलो मलंगगड, 2 फेब्रुवारीच्या यात्रेसाठी पोलीस प्रशासन इनॲक्शन

जय मलंग… श्री मलंगच्या जयघोषाने दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंगगड दुमदुमून जातो. यावर्षीही २ फेब्रुवारी रोजी हाच उत्साह पाहायला मिळणार आहे. यात्रा काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन इनअॅक्शन झाले असून आजपासून 7 फेब्रुवारीपर्यंत मलंगगड मार्गावर जड वाहतुकीला बंदी घातली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी तशी अधिसूचना जारी केली आहे.

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्री मलंग गड परिसर येतो. 2 फेब्रुवारी रोजी पालखी निघणार असून उत्सवाला सुरुवात होणार आहे. या पाश्वभूमीवर ट्रॅफिककोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली असून 7 फेब्रुवारीपर्यंत या परिसरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. ही जबाबदारी विठ्ठलवाडी उपविभागीय वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांची टीम हाताळणार आहे.

हिंदू परंपरेप्रमाणे धार्मिक विधी

2 फेब्रुवारी रोजी श्री मलंगगडावर श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी वार्षिक स्नान, पालखी, गंधलेपन, नैवेद्य, महाआरती असे सर्व धार्मिक विधी हिंदू परंपरेप्रमाणेच करण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

शिळफाटाकडून नेवाळी नाका श्री मलंगवाडीकडे येणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना काटई नाका येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने नेतिवली, टाटा पॉवर व मानपाडा पोलीस ठाणे मार्गे इच्छित स्थळी जातील.

जड-अवजड वाहनांना खोणी नाका (निसर्ग हॉटेल) येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने खोणी नाका येथून डावीकडे काटई नाका दिशेने वळण घेऊन इच्छितस्थळी जातील.

बदलापूरकडून नेवाळी नाका, श्री मलंगवाडी, नवी मुंबई व ठाणे शहराकडे जाणाऱ्या सर्व जड-अवजड वाहनांना टी पॉईंट, शिवाजी नगर येथे प्रवेश बंद असेल. ही सर्व जड-अवजड वाहने अंबरनाथ टि पॉईंट येथे उजवीकडे वळण घेऊन फॉरेस्ट नाका व साई बाबा मंदिर मार्गे इच्छितस्थळी जातील.