
केळवे समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या पालघरमधील एका मुलीला टांग्याची जोरदार धडक बसल्याने ती गंभीर जखमी झाली. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली असून केळवे बीचवर टांगा, उंट सफारीला आता चाप लावण्यात आला आहे. समुद्रकिनारी सफारीसह अन्य करमणुकीच्या साधनांना बंदी करण्याचा निर्णय केळवे सागरी पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांना दणका बसला आहे.
समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या एका १२ वर्षीय जान्हवी पाटील हिला टांग्याने जोरदार धडक दिली होती. जान्हवी ही सोमवारी सुट्टीनिमित्त आपल्या आईसह केळवे येथे पिकनिकसाठी आली होती. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावरून जात असलेल्या एका भरधाव टांग्याने जान्हवीला धडक दिली. टांगा तिच्या पोटावरून गेल्याने तिच्या डोळ्या-खांद्यांसह यकृत आणि मूत्रपिंडाला मोठी इजा झाली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. जखमी जान्हवीला पालघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थ असल्याने तिला मीरा रोड व त्यानंतर मुंबईला उपचारासाठी हलविण्यात आले.
परवान्याची मुदत संपली
समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी स्थानिक टांगे, उंट सफारी आणि बीच बाईक व्यावसायिक करत होते. पर्यटनाला वाव मिळावा म्हणून महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली होती. मात्र त्यांच्या परवान्याची मुदत संपल्याची बाब यानिमित्त समोर आली होती. त्यामुळे हे प्रकार बंद करण्याची मागणी पर्यटकांनी केळवे सागरी पोलिसांकडे केली होती.
व्यावसायिकांमध्ये सुरू होती स्पर्धा
बीच बाईक, सागरी नौकानयन, टांगा, उंट सफरी यासारख्या व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियम मोडून व्यवसाय सुरू आहे. पर्यटक मिळविण्याच्या नादात अनेकदा भांडणे झाल्याचे प्रकार घडले आहेत. जास्त फेऱ्या मारण्यासाठी व्यावसायिकांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती. त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान, आता पोलि सांनी हा प्रकार बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


























































