प्रेयसीला त्रास देणाऱ्या फुलविक्रेत्याची चाकू भोसकून हत्या, चोवीस तासांत तिघांना अटक

प्रेयसीला त्रास देत असलेला 52 वर्षीय फुलविक्रेता महेश नाखवा याची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुजरात येथे राहणाऱ्या काली उर्फ रघू चौहान (27) आणि शायर मंगरोलिया (21) या दोघांना नायगाव येथून चोवीस तासांत जेरबंद केले आहे. तसेच या घटनेत सहभागी असलेल्या गीता माळी या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे. त्या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या चेंदनी कोळीवाडा येथे राहणारे महेश नाखवा या इसमाची 28 जानेवारी रोजी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. खून केला होता. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणेनगर पोलीस व मालमत्ता गुन्हे कक्षाचे पथक करत होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे दोन मारेकऱ्यांची ओळख पटवून त्यांना नायगाव पूर्व येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पळून जाताना अटक केली तर या घटनेत सहभागी असलेल्या गीता माळी हिला अटक करण्यात आली आहे. काली उर्फ रघु याची प्रेयसी गीता माळी हिला मयत महेश नाखवा हा त्रास देत असल्याच्या कारणातून त्या दोघांनी महेशचा काटा काढण्याचे तपासात समोर आले आहे.