
बदलापुरात चार वर्षांच्या चिमुरडीवर स्कूल व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागे झाले असून नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षा चालवणाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. 1 जानेवारी 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत 300 बेशिस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून पोलिसांनी साडेनऊ लाखांचा दंड वसूल केला आला. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली आणि कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर परिसरात वाहतूक पोलिसांनी चौकाचौकात पोलीस तैनात केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार न करता तसेच आरटीओ परवाने न घेता बस, रिक्षा, ओमनी व इतर खासगी वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. जानेवारी महिन्यात 39 वाहनचालकांवर कारवाई करून 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल करण्यात आला, तर गेल्या वर्षभरात 259 वाहनांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.


























































