खारेपाट विभागाच्या पाण्याचा प्रश्न शिवसेना सोडवणार

पेण तालुक्यातील खारेपाट भागातील पाणीप्रश्न सत्ताधाऱ्यांना सोडवता आला नाही. प्रत्येक वेळी पाणीप्रश्नाचा राजकीय वापर करण्यात येतो. खारेपाट विभागातील गावे, वाड्या, पाड्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही वडखळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार समीर म्हात्रे यांनी दिली.

गेली अनेक दशके पेणमधील खारेपाट भागाला पिण्याचे पाणीप्रश्न भेडसावत आहे. मात्र सत्ताधारी निवडणूक जवळ आली की आचारसंहिता संपल्यावर पाणीप्रश्न सोडविण्याची खोटी आश्वासने देतात व मतांचे राजकारण करतात. या भागातील पाणीप्रश्न काही आजपर्यंत सुटलेला नाही. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. याशिवाय या भागातील खारबंदिस्ती, रस्ते, स्वच्छता, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना खंबीर असल्याचे म्हात्रे यांनी प्रचार सभेत सांगितले.