
रायगड जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 7 गट आणि 14 पंचायत समितीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या निवडणुकीत 2 लाख 1 हजार 923 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून पुरुष मतदारांच्या तुलनेत स्त्री मतदारांची संख्या अधिक असल्याने ‘महिलाराज’ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. अलिबाग तालुक्यात 1 लाख 3 हजार 117 महिला मतदार असून पुरुष मतदारांची संख्या 98 हजार 806 इतकी आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी या निवडणुकीसाठी झेडपीचे ढोलताशे अंतिम असणार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. अलिबाग तालुक्यात 261 मतदान केंद्रे असणार आहेत. यामध्ये एक केंद्र खास महिलासाठी आहे. मतदानासाठी 287 मतदान कंट्रोल युनिट व 574 बॅलेट युनिट अधिग्रहित करण्यात आली आहेत.
दिव्यांग, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग
मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक मतदार यांच्यासाठी स्वतंत्र रांग असणार आहे. अशा मतदारांना प्राधान्याने मतदानाची संधी दिली जाईल तसेच त्यांना व्हीलचेअर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

























































