नवी मुंबईतून जूनमध्ये परदेशात टेकऑफ, फेब्रुवारीपासून विमानतळ रात्रंदिवस सुरू राहणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या जूनपासून परदेशात टेकऑफ करता येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळाला रात्रंदिवस विमानांचे लॅण्डिग आणि टेकऑफ करण्याचा परवाना आवश्यक असतो. हा परवाना येत्या फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होणार आहे. त्यानंतर नवी मुंबई विमानतळावरून जगभरातील विविध देशांत प्रवास करता येणार आहे, असे अदानी एअरपोर्ट होल्डिग प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विंग इंडिया 2026’ मध्ये सांगितले. नवी मुंबई विमानतळावरून सध्या दररोज 23 विमानांचे उड्डाण होत आहे. मात्र विमानतळ रात्रंदिवस सुरू झाल्यानंतर विमानांच्या उड्डाणांची संख्या 34 पर्यंत पोहोचणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबरपासून प्रवासी आणि मालवाहतूक विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सुमारे एक लाख प्रवाशांचा टप्पा विमानतळाने पार केला आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळाला रात्रीही ऑपरेशन करण्याची परवानगी आवश्यक असते. हा परवाना फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची अपेक्षा आहे. रात्री ऑपरेशन करण्याचा परवाना मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या जूनपासून नवी मुंबई विमानतळावरून परदेशी विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे, असेही अरुण बन्सल यांनी ‘विंग इंडिया 2026’ मध्ये स्पष्ट केले आहे.

तासाला दहा विमाने हाताळण्याची क्षमता

नवी मुंबई विमानतळावर सध्या दररोज 23 विमानांचे टेकऑफ होत आहे. फेब्रुवारीपासून ही टेकऑफची संख्या थेट 34 पर्यंत पोहोचणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर टेकऑफ आणि लॅण्डिग करणाऱ्या विमानांचा आकडा मोठा होणार आहे. एका तासाला 10 विमाने हाताळण्याची क्षमता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची आहे. सध्या या विमानतळावरून इंडिगो, एअर इंडिया, अकासा एअर या कंपन्यांनी देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे.

  • नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी विमानतळ सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले.
  • सीआयएसएफने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर अनेक चाचण्या विमानतळावर घेण्यात आल्या. त्यानंतर ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर 2025 पासून विमानतळ प्रवासी व मालवाहतूक सेवेसाठी खुले करण्यात आले.
  • सध्या नवी मुंबई विमानतळावर विमानांचे ऑपरेशन सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत सुरू आहे. रात्री ऑपरेशन करण्याची परवानगी मिळाल्यानंतर विमानतळ 24 तास सुरू राहणार आहे.
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानांकडून एक वर्ष पार्किंग शुल्क आकारले जाणार नाही. त्यांना पार्किंग शुल्कात सूट देण्यात आली आहे. मात्र ही सवलत देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमानांना देण्यात आलेली नाही.
  • नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर 19 दिवसांत एक लाख प्रवाशांच टप्पा पूर्ण झाला आहे. दिवसेंदिवस या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. फेब्रुवारीपासून लॅण्डिग आणि टेकऑफमध्ये वाढ झाल्यानंतर प्रवाशांची संख्याही वाढणार आहे.