
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाउंटवरून म्हणजेच त्यांच्या आयटी सेलकडून विरोधकांवर टीका सुरू असते. अशी टीका केल्याप्रकरणी आता भाजपच्या ‘X’ अकाउंट विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी भाजपच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) अकाउंट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर क्राईम पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली असून यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजपच्या अधिकृत ‘X’ हँडलवरून एक पोस्टर शेअर करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे फोटो वापरून त्यांना ‘स्कॅम लॉर्ड’ (घोटाळ्यांचे सम्राट) असे संबोधण्यात आले होते. तसेच, ‘कर्नाटकला दिवसरात्र लुटणारे घोटाळ्यांचे साम्राज्य’ अशा आशयाचा मजकूरही या पोस्टमध्ये वापरण्यात आला होता.
काँग्रेसची कायदेशीर कारवाई
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (KPCC) लीगल सेलने या पोस्टवर तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपची सोशल मीडिया टीम जाणीवपूर्वक चारित्र्यहनन करत असून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपने अनेकदा उपरोधिक पोस्ट केल्या आहेत, मात्र यावेळी काँग्रेसने थेट एफआयआर (FIR) दाखल करत कायदेशीर लढाई सुरू केली आहे.
सायबर क्राईम पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. भाजपच्या आयटी सेल मधील कोणत्या व्यक्तींनी ही पोस्ट तयार केली आणि ती प्रसिद्ध केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तींना लवकरच नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावरील शाब्दिक युद्धाचे आता कायदेशीर लढाईत रूपांतर झाल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.
FIR Filed Against BJP’s X Account for ‘Scamlord’ Poster Targeting CM Siddaramaiah
Karnataka Cybercrime Police filed an FIR against BJP’s official X account for a defamatory ‘Scamlord’ poster featuring CM Siddaramaiah and DK Shivakumar. Read more about the legal battle between Congress and BJP.


























































